Home Featured आदिवासींचा आवाज दाबल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार

आदिवासींचा आवाज दाबल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार

0

माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांचा इशारा

आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हे काहीच गैर बोललेले नाहीत. प्रकाश वेळीप यांनी उटा संघटनेचा कधी गैरफायदा घेतलेला नाही. वेळीप यांच्यावर आरोप करणाऱ्यांना हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढून दाखवावा, असे आव्हान माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी काल दिले.

उटाच्या वाटेला कुणी येऊ नये. उटा ही सर्वांची चळवळ आहे, ती कधीच बंद होऊ शकणार नाही. उटाची चळवळ ही आदिवासी समाजाला आत्मसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्याची आहे. जर कोणी आदिवासी समाजाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न करत असले, तर त्यांना विरोध केला जाईल, असेही गावडे यांनी म्हटले आहे.
ज्या अधिकाऱ्याने उटा संघटनेनेवर निर्बंध घातले आहेत. त्या अधिकाऱ्याच्या कॉलची तपासणी करण्याची गरज आहे. त्या अधिकाऱ्याने कुणाच्या दबावामुळे निर्बंध लागू करणारा आदेश जारी केला हे त्यातून उघड होऊ शकते. प्रकाश वेळीप यांनी चुकीचे काहीच म्हटलेले नाही. त्यामुळे उटाला बदनाम करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. उटाने अनेक वर्षे भरीव काम केले असून, आता उटा मध्ये फूट घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गावडे यांनी केला.