गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून ‘क’ श्रेणीतील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्ज सादरीकरणासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या गोमंतकीय तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी निर्माण झाली असून, या नोकरभरतीच्या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाने राज्य सरकारच्या 12 खात्यांमधील ‘क’ श्रेणीतील 439 जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात काल प्रसिद्ध केली. आयोगाने जाहीर केलेल्या विविध जागांसाठी येत्या 8 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नवीन कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी खात्यांतील रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी घोषणा केली होती. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी या वर्षातील नोकरभरतीची दुसरी जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर ही सरकारी नोकरभरतीसंबंधी जाहिरात प्रसिद्ध केल्याने ती अधिक चर्चेत आली आहे.
राज्य सरकारच्या एकूण 12 खात्यांमध्ये नोकरभरती केली जाणार आहे. सरकारी खात्यांतील नोकरभरतीबाबत शैक्षणिक पात्रता, वय, राखीवता व इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वरील जागांसाठी घेण्यात येणाऱ्या सीबीटी परीक्षेबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.
कुठल्या सरकारी खात्यात किती जागांवर भरती?
लेखा संचालनालयात लेखापालाच्या 22 जागा.
व्यावसायिक कर विभागात व्यावसायिक कर अधिकाऱ्यांच्या 9 जागा आणि राज्य कर निरीक्षकांच्या 34 जागा.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंते (मॅकेनिकल, इलेक्ट्रिक) 25 जागा
कनिष्ठ अभियंते (इलेक्ट्रिक) एकूण 88 जागा (आरडीए 1 आणि विद्युत खाते 87 जागा)
कनिष्ठ अभियंते (सिव्हिल) एकूण 132 जागा (आरडीए, जलस्रोत, पीडब्लूडी, कृषी, पंचायत, विद्युत खाते).
कृषी खात्यात विस्तार अधिकारी 12 जागा.
वीज खात्यात स्टेशन ऑपरेटर 35 जागा.
पोलीस खात्याच्या बिनतारी संदेश विभागात साहाय्यक उपनिरीक्षक 3 जागा.
मत्स्योद्योग खात्यात मॅकेनिक (डिझेल) 1 जागा.
पशुसंर्वधन खात्यात कृषी साहाय्यक 1 जागा आणि इलेक्ट्रिशियन 1 जागा.
कृषी खात्यात कृषी साहाय्यक 4 जागा.
वीज खात्यात लाइनमन 35 जागा आणि मीटर रिडर 31 जागा.
छापखाना खात्यात साहाय्यक इलेक्ट्रिशियन 1 जागा, साहाय्यक मॅकेनिक 2 जागा.
कला व संस्कृती खात्यात साहाय्यक लाईट ऑपरेटर 2 जागा.
दंत महाविद्यालयामध्ये हेल्पर (इलेक्ट्रिक) 1 जागा.