श्रीलंकेच्या संरक्षण सचिवासह पोलीसप्रमुखांना राजिनाम्याचे आदेश

0
117

>> साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अपयश

ईस्टर संडेदिवशी येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी गुप्तचर यंत्रणेने आगाऊ सावधगिरीचा इशारा देऊनही हे हल्ले टाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी देशाचे संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो व पोलीस प्रमुख पुजित जयसुंदरा यांना पदाचे राजिनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बॉम्बहल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३५९ वर गेली आहे.

कोलंबोतील भीषण बॉम्बस्फोटानंतर देशवासियांना उद्देशून प्रथमच बोलताना सिरीसेना यांनी स्पष्ट केले की श्रीलंकेच्या संरक्षण संस्थांवरील उच्च पदांवरील अधिकार्‍यांच्या नेमणुकांमध्ये येत्या २४ तासात बदल केले जाणार आहेत.

बॉम्बस्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने देऊनही वरीष्ठ सुरक्षा अधिकार्‍यांनी कोणतीच कारवाई का केली नाही असे प्रश्‍न लोक विचारू लागले आहेत याकडे राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी लक्ष वेधले. यामुळे आता श्रीलंकेचे नवे संरक्षण सचिव म्हणून माजी लष्कर प्रमुख दया रत्नायके यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिका घडवून आणलेल्या ९ आत्मघाती हल्लेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.