श्रीलंका संघात घाऊक बदल

0
110

>> विश्‍वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा

श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने काल गुरुवारी विश्‍वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. मंडळाने काही कठोर पावले उचलताना सातत्याने टुकार कामगिरी केलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात निरोशन डिकवेला, दनुष्का गुणथिलका, दिनेश चंदीमल, उपुल थरंगा व अकिला धनंजया यांचा समावेश आहे. फलंदाजीसह डाव्या हाताने संथगती गोलंदाजी करणारा मिलिंदा सिरीवर्धने, लेगस्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू जीवन मेंडीस तसेच लेगस्पिनर जेफ्री वंदेरसे यांची संघात निवड करण्यात आली आहे. अतिरिक्त खेळाडूंमध्ये ओशादा फर्नांडो, अँजलो परेरा, कासुन रजिता व वानिंदू हसारंगा यांचा समावेश आहे. श्रीलंका मंडळाने बुधवारी कसोटी सलामीवीर दिमुथ करुणारत्ने याची कर्णधारपदी निवड करून आपल्या कठोर निर्णयाची झलक दाखवली होती. श्रीलंकेच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात ०-५ असा सपाटून मार खावा लागल्यामुळे निवड समितीने अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवून अस्त्र उगारले आहे. २१८ वनडे सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या अँजेलो मॅथ्यूजचे संघात पुनरागमन झाले आहे. मागील वर्षी त्याला तंदुरुस्तीचे कारण देऊन बाहेर ठेवण्यात आले होते.

श्रीलंका संघ ः दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरु थिरिमाने, कुशल परेरा, कुशल मेंडीस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डीसिल्वा, जेफ्री वंदेरसे, थिसारा परेरा, इसुरू उदाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडीस व मिलिंदा सिरीवर्धने.