Home Featured वॉटर मेट्रोसाठी 8 जलमार्गांची शिफारस

वॉटर मेट्रोसाठी 8 जलमार्गांची शिफारस

0

कोची मेट्रो रेल लिमिटेडकडून गोव्यातील प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पासंबंधीचा व्यवहार्यता अहवाल सादर; सुभाष फळदेसाईंची माहिती

कोची मेट्रो रेल लिमिटेडने गोव्यातील प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पासंबंधीचा व्यवहार्यता अहवाल सादर केला असून, वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी 8 जलमार्गांची शिफारस करण्यात आली आहे. आता, पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे कोचीच्या धर्तीवरील गोव्यातील जल मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे, अशी माहिती जलपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दरम्यान, या प्रकल्पांतर्गत राज्य सरकार सुमारे 87 जहाजे खरेदी करणार आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कोची मेट्रोच्या टीमसोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यातील वॉटर मेट्रोच्या प्रस्तावावर चर्चा केली.
कोची मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गोव्यातील विविध जलमार्गांचा अभ्यास करून वॉटर मेट्रोसाठी अहवाल तयार केला आहे.
राज्यात सध्या सुमारे 45 हजार प्रवासी जलवाहतुकीचा वापर करीत आहेत. राज्यात वॉटर मेट्रोची सेवा सुरू झाल्यावर हा आकडा एक लाखाचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या मदतीने हाती घेण्यात येणारा हा प्रस्तावित प्रकल्प एक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पर्यटन आकर्षण, अशा दोन्ही प्रकारे उपयुक्त ठरेल, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

कोणत्या 8 मार्गांचा समावेश?
गोव्यातील सुमारे 111 किलोमीटर अंतराचे आठ व्यवहार्य मार्ग निश्चित केले आहेत. त्यात पणजी-नार्वे, बेती-ओल्ड गोवा, ओल्ड गोवा-सरमनास, वास्को-कुठ्ठाळी, कुठ्ठाळी-दुर्भाट, जुने गोवा-कुंभारजुवा, पणजी-दोनापावल-वास्को आणि पणजी-चोपडे या जलमार्गांचा समावेश आहे. चोपडे ते केरी आणि तेरेखोलपर्यंतच्या सागरी मार्गांचा समावेश असलेला नववा मार्गही विचाराधीन आहे. या प्रकल्पांतर्गत राज्य सरकार सुमारे 87 जहाजे खरेदी करणार आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.