राज्यात आतापर्यंत ५०% पाऊस कमी

0
134

राज्यात मान्सून कमकुवत बनला आहे, असे हवामान विभागाने कळविले आहे. आतापर्यंत केवळ १२ इंच पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ही तफावत सुमारे ५० टक्के आहे. मागील चोवीस तासात पेडणे येथे १.१३ इंच पावसाची नोंद झाली. तर दाबोळी आणि मुरगाव येथे अर्धा इंच पावसाची नोंद झाली असून अन्य ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झालेली नाही.

राज्यात गेल्या २० जून रोजी मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनानंतर केवळ एकच दिवस चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर दोन – तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, जोरदार पावसाची शक्यता फोल ठरली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. रविवारी राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन १४ दिवस उशिराने झालेले आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पावसाला हवा तेवढा जोर दिसून येत नाही. जून महिन्यात आत्तापर्यंत केवळ १२.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतचे पावसाचे प्रमाण ५१ टक्के एवढे कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत २५ इंच पावसाची नोंद व्हायला हवी होती.

गेली चार वर्षे कमी पाऊस
राज्यातील मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास मागील चार वर्षे मान्सून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. वर्ष २०१५ मध्ये २० टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. वर्ष २०१६ मध्ये १ टक्के पावसाची कमी नोंद झाली होती. वर्ष २०१७ मध्ये १४ टक्के पावसाची कमी नोंद झाली होती. तर, वर्ष २०१८ मध्ये १९ टक्के पावसाची नोंद कमी झाली झालेली आहे.