अनाथ, निराधारांना गोमेकॉत चांगली सेवा देणार : विश्‍वजित

0
133

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणार्‍या अनाथ, निराधार व दारिद्य्र रेषेखालील लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी गोमेकॉने पावले उचलली असून ह्या कामासाठी ‘स्ट्रीट प्रोव्हिडन्स’ ह्या बिगर सरकारी संघटनेशी हातमिळवणी केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.

गोमेकॉत रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी तसेच तपासणीसाठी येत असतात. मात्र, उपचारासाठी येणार्‍या रुग्णांपैकी अनाथ, निराधार असे जे लोक असतात ते मुळातच कुपोषित असल्याने गोमेकॉतील रांगेत तासन तास उभे राहताना त्यांना फार त्रास होत असतात. त्यामुळे यापुढे अशा रुग्णांना जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये व उपचारासाठी तसेच तपासणीसाठी येणार्‍या अशा रुग्णांची कामे लवकर व जलदगतीने व्हावीत यासाठी ‘स्ट्रिट प्रोव्हिडन्स’ ह्या बिगर सरकारी संघटनेची मदत घेण्यात येणार आहे. ह्या संघटनेचे सदस्य गोमेकॉत येणार्‍या अशा रुग्णांची कामे जलदगतीने व्हावीत व त्यांना लांब रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी त्यांना मदत करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.