बिहारमध्ये आता सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल केली. नितीश कुमार यांच्या निर्णयानुसार, आता बिहार राज्यातील मूळ रहिवासी महिलांना राज्यातील सर्व सरकारी सेवा, संवर्ग आणि सर्व स्तरांवरील पदांवरील भरतीमध्ये 35 टक्के आरक्षण लागू असणार आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
काल पाटणा येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये सर्व श्रेणी तथा स्तरावरील सर्व प्रकारच्या पदांवर भरतीमध्ये बिहारमधील मूळ रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांसाठी 35 टक्के आरक्षण यापुढे देण्यात येईल, असे नितीश कुमार ह्या घोषणेनंतर म्हणाले. तसेच सरकारी आणि सार्वजनिक विभागाच्या सेवांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.जास्तीत जास्त महिलांनी प्रशासनात महत्वाची भूमिका बजावावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बिहार युवा आयोगाची स्थापना
याशिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये बिहार युवा आयोगाची स्थापना करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. बिहारमधील तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.