प्र. कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीस कॉंग्रेसचा विरोध ः हस्तक्षेप अयोग्य

0
100

गोवा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला कॉंग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप योग्य नाही. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरुण सहानी यांनी प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्तीचा सादर केलेला प्रस्ताव म्हणजे शिक्षण क्षेत्रात राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे, अशी टिका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

गोवा विद्यापीठावर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे. कुलगुरूंनी विद्यापीठाची स्वायत्तता कायम राखण्यावर भर देण्याची गरज असताना गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरुण सहानी राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करतात हे कमजोरपणाचे लक्षण आहे. हा प्रस्ताव सादर करण्यामागचा उद्देश कळत नाही, असेही चोडणकर यांनी सांगितले. गोवा विद्यापीठावर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात ९०७ विद्यापीठे कार्यरत आहे. तसेच, देशभरात ३९९ राज्य विद्यापीठे आहेत. एकाही विद्यापीठावर प्र-कुलगुरूची नियुक्ती झालेली नाही. गोवा विद्यापीठात गैरव्यवहार होत असल्यास ऑडिट तपासणी कडक करण्याची गरज आहे. गोवा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्याची नियुक्ती हा चुकीचा पायंडा ठरू शकतो, असेही चोडणकर यांनी सांगितले.

तिसर्‍या मांडवी पुलावरील विद्युत कामातील घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले जाणार आहे, असे चोडणकर यांनी सांगितले. गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाने केलेल्या खुलाशात घोटाळ्याला दुजोरा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापुढे भ्रष्टाचार प्रकरणी बोलण्याचा अधिकार गमावून बसले आहे, अशी टिका चोडणकर यांनी केली.