जीवघेण्या फर्मागुढी-ढवळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीची नागरिकांची मागणी

0
135

फर्मागुढी ते ढवळीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे अयोग्य नियोजन आणि निकृष्ट कामामुळेच या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. सरकारने या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काशीमठ येथे एकत्र झालेल्या जागृत नागरिकांनी केली.

फर्मागुढी – ढवळी चौपदरी महामार्गावर बुधवारी काशीमठ-बांदोडा येथे क्रेन उलटून एकजण ठार झाला. गुरुवारी या जागृत नागरिकांनी बळी पडलेल्या दुर्दैवी युवकाला श्रद्धांजली अर्पण केली. या चौपदरी व भुयारी मार्गाचे उद्घाटन करून लावलेल्या नामफलकाला फुलांचा हार अर्पण करून व उदबत्त्या लावून अनोखा निषेध व्यक्त केला. यावेळी ऍड. सुरेल तिळवे, गुरुदास नाईक, ब्रम्हानंद नाईक, गोवा रस्ता सुरक्षा मंचचे दिलीप नाईक, दिनेश गावणेकर व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना नियोजनशून्यरित्या बांधलेल्या या चौपदरी रस्त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत पाच अपघात झाले. त्यात एक जीवघेणा ठरला.

धोकादायक वळणे तसेच उतरण आणि भुयारी मार्गाचे अयोग्य बांधकाम यामुळे अपघातांचा हा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या चौपदरी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालक गोंधळत असून अपघात घडत आहेत. या महामार्गाचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले आहे. यासंबंधी बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. आधी योग्य नियोजन करा, अपघातप्रवण भागाचे दुरुस्तीकाम करून चौपदरी रस्ता व भुयारी मार्ग वाहतूकयोग्य करा, असे ग्रामसभेत सांगितले असतानाही त्यासंबंधी योग्य कार्यवाही झाली नाही.