Home बातम्या पोलीस पडताळणीशिवाय भाडेकरू ठेवू नका

पोलीस पडताळणीशिवाय भाडेकरू ठेवू नका

0

>> मुख्यमंत्र्यांचा घरमालकांना सल्ला; राज्यातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परप्रांतीयच अधिक सामील

राज्यातील गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयाचा सहभाग जास्त आहे. मूळ गोमंतकीयांचे प्रमाण केवळ 2-3 टक्के एवढेच आहे. रोजगारासाठी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने भाडेकरूंची पडताळणी सक्तीची केली आहे. घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना त्याची प्रथम पोलिसांकडून पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल केले.

आमदार क्रूझ सिल्वा व इतर आमदारांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे एका लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत काल सरकारचे लक्ष वेधले.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे, असे या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले.

महिला आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. परराज्यातील चोरटे गोव्यातील विविध भागांत आश्रय घेत आहेत. आपल्या मतदारसंघातील एका स्थानिकांवर परराज्यातील एका चोरट्यांने हल्ला करण्याची घटना घडली, असे आमदार क्रूझ सिल्वा यांनी निदर्शनास आणून दिले.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे गोव्याचे नाव बदनाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील गुन्ह्यांचा छडा लावला जातो. मात्र, आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणखी सक्षम करण्याची गरज आहे, असे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले. आमदार व्हेन्झी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, विजय सरदेसाई, वीरेश बोरकर यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली.