मये – पैरा परिसरातील साळगावकर खाण कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीनंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींविषयी कंपनीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मये – पैरा टेनंट असोसिएशनने सुमारे साडेचार महिन्यांपूर्वी खाण कंपनीकडे प्रदूषणाबाबत लेखी पत्रव्यवहार केला होता. या पत्रासोबत प्रदूषणासंबंधीची सविस्तर माहिती गोळा करून तयार केलेली फाईलही कंपनीकडे सादर करण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यानंतर ग्रामस्थांनी थेट गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबींवर मंडळाने कंपनीला आवश्यक त्या सूचना देत प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच, या प्रकरणावर पुढील कार्यवाही सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.