Home बातम्या पणजी महापालिकेसाठी 69.07 टक्के मतदान

पणजी महापालिकेसाठी 69.07 टक्के मतदान

0

शुक्रवारी होणार मतमोजणी

69 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

दोन्ही गटांकडून विजयाचा दावा

पणजी महानगरपालिका मंडळाच्या 30 जागांसाठी काल घेण्यात आलेल्या निवडणुकीत 69.07 टक्के मतदान झाले असून 69 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद झाले आहे. महानगरपालिका निवडणूक मतदानाच्या काळात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे समर्थन लाभलेल्या टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी आणि उत्पल पर्रीकर यांनी पाठिंबा दिलेल्या आमी पणजीकर या दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. येत्या शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी 8 वाजता बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 32,496 मतदारांपैकी 22,445 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष 10575 आणि महिला 11870 मतदारांचा समावेश आहे. प्रभाग 23 मध्ये सर्वाधिक 81.94 टक्के आणि सर्वांत कमी प्रभाग 3 मध्ये 53.09 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पणजी महानगरपालिका मंडळाच्या निवडणुकीसाठी 48 केंद्रांवर सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात मतदानाचे प्रमाण कमी नोंद झाले होते. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी थोडी वाढली. उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यरत होते.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी
महानगरपालिका क्षेत्रात फेरफटका मारून मतदानाचा आढावा घेतला. आमी पणजीकर गटाचे उत्पल पर्रीकर यांनी विविध मतदान केंद्रांवर फेरफटका मारून मतदानाचा आढावा घेतला.
महसूल मंत्री, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यासाठी पणजी महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुरस्कृत गटासमोर उत्पल पर्रीकर यांच्या आमी पणजीकर गटाने कडवे आव्हान उभे केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता, सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहेत.

प्रभागवार मतदान
पणजी महानगरपालिकेच्या एकूण 30 प्रभागांत पुढील टक्केवारीनुसार मतदान झाले. त्यानुसार प्रभाग 1 ः 70.59 टक्के, प्रभाग 2 ः 72.28 टक्के, प्रभाग 3 ः 53.09 टक्के, प्रभाग 4 ः 55.82 टक्के, प्रभाग 5 ः 55.16 टक्के, प्रभाग 6 ः 62.83 टक्के, प्रभाग 7 ः 58.64 टक्के, प्रभाग 8 ः 69.99 टक्के, प्रभाग 9 ः 68.47 टक्के, प्रभाग 10 ः 74.37 टक्के, प्रभाग 11 ः 78.79 टक्के, प्रभाग 12 ः 72.45 टक्के, प्रभाग 13 ः 76.97 टक्के, प्रभाग 14 ः 81.20 टक्के, प्रभाग 15 ः 78.15 टक्के, प्रभाग 16 ः 67.27 टक्के, प्रभाग 17 ः 66.19 टक्के, प्रभाग 18 ः 74.35 टक्के, प्रभाग 19 ः 76.50 टक्के, प्रभाग 20 ः 67.95 टक्के, प्रभाग 21 ः 78.18 टक्के, प्रभाग 22 ः 79.20 टक्के, प्रभाग 23 ः 81.94 टक्के, प्रभाग 24 ः 69.26 टक्के, प्रभाग 25 ः 61.05 टक्के, प्रभाग 26 ः 64.19 टक्के, प्रभाग 27 ः 66.39 टक्के, प्रभाग 28 ः 77.56 टक्के, प्रभाग 29 ः 62.24 टक्के आणि प्रभाग 30 मध्ये 74.10 टक्के मतदान झाले.