आम आदमी पक्षासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नावांचा केला उलगडा
राज्यातील सरकारी नोकरी घोटाळ्यातील एक संशयित आरोपी पूजा नाईक हिने काल या घोटाळ्याशी संबंधित मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंता यांची नावे उघड केली. पूजा नाईक हिने आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्या उपस्थितीत काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपली ओळख आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि अभियंत्ता उत्तम पार्सेकर यांच्याकडे करून दिल्याचा दावा केला. त्यानंतर आपण निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांच्याकडे पैसे दिल्याचे तिने उघड केले.
2019 च्या नोकरभरती दरम्यान अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उत्तम पार्सेकर यांना 17.68 कोटी रुपये आणि 613 अर्ज दिले होते. पर्वरी येथील फ्लॅटमध्ये हे पैसे दिले होते. आपण मगोपच्या कार्यालयात नोकरी करताना देखील सरकारी नोकरीसाठी अर्ज आणि पैसे दिले होते, असा दावा पूजा नाईक हिने केला. आपण यापूर्वी पैसे घेऊन 80 हून अधिक जणांना सरकारी नोकरी मिळवून दिली आहे; परंतु 2019 ते 2022 दरम्यान झालेल्या नोकरभरतीमध्ये पैसे घेतलेल्या एकाही उमेदवाराला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नोकरीसाठी घेतलेले पैसे परत करावे, अशी आपली मागणी आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर
जबानी नोंदवा : आप
नोकरभरती घोटाळ्यातील संशयित आरोपी पूजा नाईक हिची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी ॲड. अमित पालेकर यांनी केली.
दीपक ढवळीकरांकडून आरोपांचा इन्कार
नोकरी घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईक ही मगो पक्षाच्या कार्यालयात कधीही कामाला नव्हती, असे काल मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
मगो पक्षाशीही तिचा कोणताही संबंध नव्हता, असे ढवळीकर यांनी नमूद केले. आपण पूर्वी मगो पक्षाच्या कार्यालयात काम करीत होते, असे पूजा नाईक यांनी जे सांगितले आहे ते खोटे आहे. ती आमच्या कार्यालयात कधीच कामाला नव्हती. तसेच मगो पक्षाशी तिचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचा खुलासा काल दीपक ढवळीकर यांनी केला. जर कुणी पक्षाचे नाव वापरून लोकांकडून पैसे घेत असतील तर त्यांची चौकशी व्हायला हवी. आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे ढवळीकर म्हणाले. पूजा नाईक ही विनाकारण मगो पक्षाचे नाव घेऊन पक्षाला बदनाम करू पाहत आहे. ती मगो पक्षाच्या कार्यालयात कधी काम करीत होती, त्याचे पुरावे तिने द्यावेत. नाहक खोटे बोलून पक्षाला बदनाम करू नये, असे ढवळीकर म्हणाले.
तपास पूर्ण होऊ द्या; मग
बोलेन : सुदिन ढवळीकर
गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नोकरी घोटाळ्याचे तपासकाम जोपर्यंत पूर्ण करीत नाहीत, तोपर्यंत आपण काहीही बोलणार नसल्याचे काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे बँकेमार्फत होत असतात आणि पोलीस ते तपासू शकतात, असेही ढवळीकर म्हणाले.