Home बातम्या दिल्लीतील हॉटेलला लागलेल्याआगीत 21 जणांचा मृत्यू

दिल्लीतील हॉटेलला लागलेल्याआगीत 21 जणांचा मृत्यू

0

दिल्लीच्या मालवीय नगर भागातील ‘फ्लोरीश स्टे हॉटेल’मध्ये बुधवारी लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 17 परदेशी नागरिकांचा समावेश असून, ते बांगलादेश आणि विविध आफ्रिकन देशांतील रहिवासी होते.
धक्कादायक बाब म्हणजे, मृतांमध्ये गुरुग्रामधील एका कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे. या कुटुंबातील जावई, मुलगी आणि दोन नातींसह कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
दिल्ली अग्निशामक दल आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवीय नगर येथील या हॉटेलमध्ये असलेल्या उपहारगृहात सकाळी 8:50 वाजता आगीचा भडका उडाला. त्यानंतर ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील खोल्यांमध्ये तसेच तळघरातही वेगाने पसरली.

अग्निशामक दलाच्या पथकाने इमारतीमधून 37 लोकांना सुखरूप बाहेर काढले. या इमारतीकडे अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. या हॉटेलमध्ये एकूण 25 खोल्या आहेत.
या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी हताश होऊन खाली उड्या मारताना दिसत आहेत. खाली पडताना होणारा आघात कमी करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी जमिनीवर गाद्याही अंथरल्या होत्या.
तळघरातूनही सहाहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एकूण 40 लोकांची सुटका करण्यात आली असली, तरी त्यातील अनेकांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बचावात 10 जवान जखमी
बचावकार्यादरम्यान दिल्ली पोलिसांचे 10 जवानही जखमी झाले आहेत. त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.