अरुण जेटली पंचत्वात विलीन

0
109
New Delhi: Home Minister Amit Shah pays his respects to the mortal remains of BJP leader and former finance minister Arun Jaitley at BJP HQ, in New Delhi, Sunday, Aug 25, 2019. Jaitley aged 66 died on Saturday at AIIMS after undergoing treatment at the hospital, where he was admitted on August 9, 2019. (PTI Photo/Shahbaz Khan)(PTI8_25_2019_000020B)

शनिवारी निधन झालेले भारताचे माजी वित्त व संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यावर काल येथील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री, जेटली यांचे हजारो चाहते तसेच विदेशी प्रतिनिधीही उपस्थित होते.

६६ वर्षीय जेटली यांचे एम्स इस्पितळात शनिवारी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. काल त्यांचे पार्थिव भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नंतर ते मिरवणुकीने निगमबोध घाट येथे आणले गेले. तेथे त्यांचे पुत्र रोहन यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
काल सकाळी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल व ज्योतिरादित्य शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.

अनेक महनीय, अती महनियांची अंत्यसंस्कारांस उपस्थिती
अंत्यसंस्कारांस उपस्थित असलेल्या अन्य महनीय, अती महनीयांमध्ये ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भाजपचे कार्यवाहू अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, पियुष गोयल, हर्षवर्धन, प्रतापचंद्र सारंगी, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, योग गुरु बाबा रामदेव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, कैलाश विजयवर्गीय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा, हरयाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर यांचा समावेश होता. यावेळी अनेक नेत्यांनी अरूण जेटली यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया दिल्या. माजी संरक्षणमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अवघ्याच दिवसांत जेटली कालवश झाल्याने सत्ताधारी भाजपला तो मोठा धक्का ठरला आहे.

भाजपने वर्षभरातच दिग्गजांना गमावले
अरूण जेटली यांच्या निधनामुळे अवघ्या वर्षभरातच भाजपने काही दिग्गज नेते गमावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कर्नाटकमधील नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार आणि अलीकडेच माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज अशी दिग्गजांची नामावली आहे.