बदली होऊन सुध्दा जुन्या ठिकाणी गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या 850 पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी येत्या रविवारपर्यंत रुजू होण्याचे निर्देश काल देण्यात आले.
पोलीस उपमहानिरीक्षकांनी पोलीस मुख्यालयात पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या विषयावर काल एक बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील सर्व पोलीस स्थानकांतील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. मागील पाच वर्षात बदलीचा आदेश जारी झालेले 850 पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी अजूनपर्यंत रुजू झालेले नाहीत. बदली झालेले हे पोलीस कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत आहेत, असे स्पष्ट झाले आहे. उपमहानिरीक्षकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्या पोलिसांना बदलीच्या जागी रुजू होण्याचा निर्देश दिला.