Home Featured 37 जणांना समन्स बजावल्याने पोलीस स्थानकावर मोर्चा

37 जणांना समन्स बजावल्याने पोलीस स्थानकावर मोर्चा

0

>> साखळेश्वर देवस्थान वाद प्रकरणी दाखल आरोपपत्रावर आज न्यायालयात सुनावणी

सात महिन्यांपूर्वी भूमिका देवस्थानाशेजारीच असलेल्या साखळेश्वर देवस्थानाच्या उत्सवावरून महाजनांच्या दोन गटांमध्ये वाद उफाळला होता. गत डिसेंबर महिन्यात या देवस्थानाचा वर्धापन साजरा करण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. यावेळी एकमेकांवर दगडफेक, मारहाण, महामार्ग रोखणे अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी एकूण 37 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावर पहिली सुनावणी शुक्रवार दि. 25 जुलै रोजी होणार आहे. याविषयीचे समन्स संबंधितांना प्राप्त झाल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर जवळपास 500 पेक्षा जास्त जणांनी गुरुवारी संध्याकाळी वाळपई पोलीस स्थानावर मोर्चा नेत गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली.

सविस्तर माहितीनुसार, गत डिसेंबरमध्ये साखळेश्वर देवस्थानाच्या उत्सवावरून वाद निर्माण झाला होता. एका गटाने देवस्थानचा वर्धापनदिन पहाटेच साजरा केला होता. त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला होता. यावेळी शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसन मारामारीत झाले होते. यावेळी अनेकांना मारहाण करण्यात आली होती. तसेच रात्री पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. याशिवाय गोवा-बेळगाव दरम्यानचा महामार्ग आंदोलकांनी रोखला होता. त्यामुळे पोलिसांनी एकूण 37 जणांवर गुन्हे दाखल केले होते.

काल संबंधित 37 जणांना समन्स मिळाल्यानंतर जवळपास 500 जणांनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा केला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निरर्थक ठरला. जोपर्यंत गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत वाळपई पोलीस स्थानकातून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
याची गंभीर दखल घेऊन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी तातडीने सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव पोलीस स्थानकातून
मागे हटला.

आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
या प्रकरणात ज्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, त्यांच्या एका शिष्टमंडळासोबत शुक्रवार दि. 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पर्वरी येथील विधानसभा कक्षामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.