सिंधू चॅम्पियन

0
92

>> विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा सुवर्ण दुष्काळ संपवला

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने काल रविवारी विश्‍व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला एकतर्फी लढतीत २१-७, २१-७ असे पराभूत केले. विश्‍व अजिंक्यपदावर मोहोर उमटवणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. सिंधूने चीनची स्टार झांग निंग हिच्या विक्रमाशी बरोबरी साधली. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत निंग हिच्याप्रमाणेच सिंधूने १ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके पटकावली आहेत. या विजयासोबतच सिंधूने ओकुहाराविरुद्धचा जय-पराजयाचा रेकॉर्ड ९-७ असा केला आहे.

अंतिम सामन्याची सुरुवात २२ फटक्यांच्या दीर्घ रॅलीने झाली. सिंधूने नेटलगत चूक केल्याने पहिला गुण ओकुहाराने मिळविला. प्रारंभीची ही सकारात्मक बाब सोडल्यास ओकुहाराला पहिल्या गेममध्ये प्रभाव पाडता आला नाही. ओकुहाराला कोर्टच्या कोपर्‍यांत ढकलल्यानंतर जोरदार स्मॅशचा वापर करत सिंधूने वेगवान खेळ दाखवला. ओकुहाराने स्मॅश परतवलीच तर नेटलगत अलगद फटका खेळून सिंधूने ओकुहाराला अक्षरशः नाचवले. सिंधूने पहिल्या गेममध्ये दोनवेळा लागोपाठ आठ गुणांची कमाई केली. सर्वप्रथम ८-१ अशी व यानंतर १६-२ अशी आघाडी सिंधूने घेतली. सिंधूने काही वेळ हलके घेतल्यानंतर ओकुहाराने काही गुण घेत सन्मानजनक स्थिती गाठली. परंतु, या पलीकडे तिला काही जमले नाही.

दुसर्‍या गेममध्ये ओकुहाराने आपल्या खेळाच्या गतीत बदल करत सिंधूवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केले. परंतु, सिंधूने ही रणनीती ओळखत ओकुहाराला वरचढ होऊ दिले नाही. दुसर्‍या गेमच्या प्रारंभीच सिंधने ९-२ अशी मोठी आघाडी घेतली. यानंतर पुढील नऊ पैकी सात गुण आपल्या खात्यात जमा करत अंतर १६-४ असे फुगवले. अंतिम रेषेजवळ सिंधूने लगावलेला जोरदार स्मॅश परतवताना नेट ओलांडता न आल्याने ओकुहाराचा खेळ खल्लास झाला. यापूर्वी विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदाला गवसणी घातली. १९७७ साली या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर भारताला सुवर्णपदकापासून दूर रहावे लागले होते. कालच्या विजयासह सिंधूने सुवर्ण दुष्काळ संपुष्टात आणला. विजयानंतर सिंधूने प्रशिक्षक किम जी ह्यून व पुल्लेला गोपीचंद यांचे आभार मानले. सिंधूने आपला हा ऐतिहासिक विजय आई विजया हिला समर्पित केला.