शूरा मी वंदिले!

0
143

गोवा मुक्तिसंग्रामातील एक धगधगती ज्वाला काल विझली. मोहन रानडे ऊर्फ मनोहर आपटे या झुंजार, लढवय्या सेनानीने आपला अखेरचा निरोप घेतला. ज्याचे अवघे आयुष्यच एक संगर बनले असा हा स्वातंत्र्यसेनानी. गोव्याशी ना नाते, ना पाते, परंतु नोकरीच्या निमित्ताने सांगलीचे मनोहर आपटे गोव्यात आले आणि गोव्याच्या मुक्तिसंग्रामाशी असे काही जोडले गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या कृतज्ञ उल्लेखाविना मुक्तिलढ्याचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. बालपणी सांगलीच्या व्यायामशाळेतून कमावलेले कणखर शरीर आणि लोकमान्य टिळकांसारख्या जहाल नेत्याचे झालेले प्रत्यक्ष दर्शन, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकरांचा लाभलेला सहवास यांनी घडवलेले कणखर मन यातून हे रसायन घडले होते. त्यामुळे आपल्या जीवनाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी व्हायला हवा ही तळमळ त्यांच्या ठायी निर्माण झाली तर नवल नाही. गोव्यातील वास्तव्यात पोर्तुगिजांशी दोन हात करायचे असतील तर ते शस्त्रांनिशीच करावे लागतील असे ठामपणे वाटल्याने सशस्त्र लढ्याचा मार्ग त्यांनी अनुसरला आणि त्याचे परिणामही भोगले. पोर्तुगीज लष्करी न्यायालयाने बेतीच्या चौकीवरील हल्ल्यावेळी त्यांना पकडून २६ वर्षे कारावासाची अत्यंत कठोर सजा सुनावली होती. आधी आग्वादला आणि नंतर पोर्तुगालात खडतर कारावास त्यांच्या नशिबी आला. त्यांना अटक झाली ते वर्ष होते १९५६ आणि महत्प्रयासाने सुटका झाली ते वर्ष होते १९६९. म्हणजे झालेल्या २६ वर्षांच्या शिक्षेपैकी तेरा वर्षे त्यांना प्रत्यक्षात तुरुंगवासात घालवावी लागली. त्यातली सहा वर्षे निव्वळ एकांतवासाची होती. त्यांच्या पदरी केवढे अमानुष क्रौर्य आले होते याची कल्पनाही अंगावर काटा आणते. दुसरा कोणीही लेचापेचा असता तर या कारावासाच्या काळात वेडाच झाला असता, परंतु रानडेंनी आपले मनोबल टिकवले. पोर्तुगालमध्ये कारावासात असताना देखील ते तेथील सालाझारशाहीशी लढणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या संपर्कात राहिले यावरून त्यांच्या प्रखर मनोबलाची आपल्याला कल्पना येते. ऑपरेशन विजय अंती गोवा मुक्त झाला, परंतु तत्कालीन भारत सरकारला मोहन रानडेंची आठवण राहिली नाही. खरे तर पकडल्या गेलेल्या पोर्तुगीज सैनिकांच्या बदल्यात त्यांच्या सुटकेचा आग्रह भारत सरकारला धरता आला असता, परंतु तो धरला गेला नाही. शेवटी त्यांच्या सुटकेसाठी नागरिकांना पुढाकार घ्यावा लागला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अथक प्रयत्नांती गोवा मुक्तीनंतर आठ वर्षांनी त्यांची सुटका होऊ शकली. तब्बल तेरा वर्षे तुरुंगवासात घालवून बाहेर आल्यानंतर आपल्या भोवतीचे अवघे जगच बदलल्याचे त्यांना दिसले. सुटका झाल्यावेळी आपल्याला रस्त्यावरून धड चालताही येत नव्हते, असे त्यांनी आपल्या ‘सतीचे वाण’ या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे. सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे मोहन रानडे या सेनानीची कथा त्यांच्या सुटकेनंतर संपत नाही. भारतात परतल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले. गोमंतक मराठी शिक्षण परिषद, महिला व बालक कल्याणगृह, रेडक्रॉस आणि अलीकडे पुण्याची जीवनज्योत या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते सतत समाजसमर्पित राहिले. आपल्या उतारवयामध्येही त्यांनी पुण्यामध्ये ठेवलेला जनसंपर्क आणि उभे केलेले कार्य स्तिमित करणारे आहे. विजीगीषू वृत्ती म्हणजे काय याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहन रानडे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गोव्यासाठी लढलेल्या रानडेंच्या पदरी सगळेच कौतुकाचे हार आले नाहीत. निंदाही तितकीच वाट्याला आली. त्यांच्याच एकेकाळच्या सहकार्‍यांनी त्यांच्यावर शिंतोडे उडवले. त्यातले खरे, खोटे काही असो, रानडे यांनी गोव्यासाठी केलेल्या त्यागाचे पारडे त्या सर्व किटाळांपेक्षा नक्कीच अधिक भरेल. आपल्या आयुष्याची ऐन उमेदीची वर्षे त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामाला दिली. नगरहवेलीच्या संग्रामात भाग घेतला. गोव्याच्या मुक्तीसाठी आघाडीवर राहून अतुलनीय योगदान दिले. गोवा मुक्तीसाठी निव्वळ आंधळेपणाने नव्हे, तर एक प्रखर वैचारिक अधिष्ठान घेऊन ते लढले हे विसरता येणार नाही. मोहन रानडे हे गोव्याच्या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासातले एक धगधगते पर्व आहे. त्यांनी सोसलेला तेरा वर्षांचा कारावास, त्यातला सहा वर्षांचा निव्वळ एकांतवास याविषयी नुसते वाचताना, ऐकताना आपल्या अंगावर काटा येतो. आपल्या आयुष्यामध्ये नाना भोग भोगूनही ते सदैव हसतमुख राहिले. कारावासात त्यांनी भोगलेला अपरिमित छळ, त्यातही ताठ राखलेला आपला बाणा हे सगळे नव्या पिढीपर्यंत गेले पाहिजे. रानडे आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती गोवा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात नक्कीच चिरंतन राहतील. दीनानाथांनी अजरामर केलेल्या नाट्यपदाचे शब्द म्हणूनच यावेळी आठवतात –
धारातीर्थी तप जे आचरिती |
सेनापती यश याचि बले ॥
शिरकमला समरी अर्पिती |
जनहित पूजन वीरा सुखशांती ॥ शूरा मी वंदिले !