Home बातम्या वादग्रस्त सीमा, मंदिरावरुन थायलंड-कंबोडियामध्ये संघर्ष

वादग्रस्त सीमा, मंदिरावरुन थायलंड-कंबोडियामध्ये संघर्ष

0

कंबोडिया आणि थायलंडमध्ये यांच्यात वादग्रस्त सीमेवरुन सुरू झालेला संघर्ष टिपेला पोहोचला आहे. कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. तत्पूर्वी गुरुवारी सकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी सीमेजवळ एकमेकांवर गोळीबार केला. त्यात आतपर्यंत 11 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत.

बौद्ध लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या दोन देशांमध्ये वादग्रस्त सीमा आणि एका प्राचीन शिव मंदिरावरुन वाद सुरू आहे, ते मंदिर प्रीह विहार म्हणून ओळखले जाते. कंबोडिया आणि थायलंड यांची 817 किलोमीटरची सीमा एकमेकांना लागून आहे. ही सीमा निश्चित करण्यात फ्रान्सची प्रमुख भूमिका राहिली आहे. 1863 ते 1953 या कालावधीत फ्रान्सने कंबोडियावर राज्य केले. अकराव्या शतकात उभारण्यात आलेले प्रीह विहार मंदिर कंबोडियात येणाऱ्या डांगरेक पर्वतात दाखवण्यात आल्याने थायलंडने आक्षेप नोंदवला. कंबोडियाचा दावा आहे की हे मंदिर त्यांच्या सीमेत आहे, तर थायलंडचे म्हणणे आहे की, मंदिराचा काही भाग त्यांच्या सुरिन प्रांतात येतो.
कंबोडियाने मंदिराचा वाद 1959 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला. 1962 मध्ये कंबोडियाच्या बाजूने निकाल लागला. थायलंडने हा निर्णय पूर्णत: मान्य केलेला नाही. मंदिराच्या आसपासच्या सीमा वादग्रस्त असल्याचे थायलंडचे म्हणणे आहे.