जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती
राज्यात मोसमी पावसाला विलंब झाला तरी पिण्याच्या पाण्याच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील प्रमुख जलस्रोत एक महिना पुरले एवढा पाण्याचा साठा आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत कुठलीही चिंता करू नये. अंजुणे आणि पंचवाडी या धरणामध्ये एक महिना पुरले एवढे पाणी आहे. तर, साळावली धरणामध्ये दोन महिने पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. मोसमी पावसाला विलंब झाला तरी पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदी दर वाढवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे दुधाच्या खरेदी दरात वाढ केली जाणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
डिचोली तालुक्यातील आमठाणे येथील धरणामध्ये 54 टक्के, तिलारी धरणामध्ये 32 टक्के पाण्याचा साठा आहे. काणकोण तालुक्यातील चापोली धरणात 40 टक्के आणि गवाणे धरणात 44 टक्के पाण्याचा साठा आहे.
अंजुणे धरणातील पाणी पातळी खालावली
राज्यातील सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अंजुणे धरणातील पाण्याचा साठा 14 टक्क्यांवर आला आहे. तर, फोंडा तालुक्यातील पंचवाडी धरणातील पाण्याचा साठा 23 टक्क्यांवर आला आहे. दक्षिण गोव्यातील प्रमुख साळावली धरणामधील पाण्याचा साठा 29 टक्क्यांवर आलेला आहे.