योगदिन यशस्वीतेसाठी शिक्षण खात्याचा पुढाकार

0
134

>> शिक्षण संचालकांचे परिपत्रकाद्वारे आवाहन

राज्य शिक्षण खात्याने पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वी करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण संचालक नागराज होन्नकेरी यांनी जारी परिपत्रकातून केले आहे.

शिक्षण खात्याने यासंबंधी एक परिपत्रक तयार करून राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना पाठविले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. राज्य, जिल्हा, गट, पंचायत पातळीवरील या दिवशी सकाळी ७ ते ८ यावेळेत सामूहिक योग प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये शिक्षण संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण खात्याने परिपत्रकातून केले आहे.
शिक्षण संस्थांनी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल व छायाचित्रे गोवा समग्र शिक्षा प्रकल्प संचालकांकडे सादर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पातळीवर योगदिन आयोजनाची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. योगदिन कार्यक्रमाची योग शिक्षकांना माहिती देण्यासाठी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय आयुषमंत्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. योग दिनानिमित्त घेण्यात येणार्‍या प्रात्यक्षिकांची सविस्तर माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे.