Home Featured मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणारी इराणी टोळी गजाआड

मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणारी इराणी टोळी गजाआड

0

राज्यात विविध ठिकाणी दुचाकीवरून फिरून रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून पलायन करणाऱ्या इराणी टोळीतील दोघांना अटक करण्यात उत्तर गोवा पोलिसांना काल यश आले. त्यांच्या अटकेमुळे चार प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, अब्बास अस्लाम झैदी (34, रा. ठाणे-महाराष्ट्र) आणि शरीफ शहा (रा. मनमाड-नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याशिवाय पोलिसांनी एक दुचाकी (क्र. एमएच-14-ईडब्ल्यू-3215) देखील जप्त केली आहे.

कालच्या एका घटनेत शेळपे-धुळेर म्हापसा येथे सकाळी पावणे आठच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर ते पर्वरीच्या दिशेने पळून गेले. या घटनेची माहिती म्हापसा पोलिसांनी बिनतारी संदेशाद्वारे सर्व पोलीस स्थानकांना देऊन सतर्क केले. मेरशी येथे सकाळी 10 च्या सुमारास गस्त घालताना पोलीस शिपाई देवेंद्र तारी याला दुचाकीवरून हे संशयित आरोपी फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने दुचाकीचा पाठलाग करून एका चोरट्याला पकडण्यात यश मिळविले. मात्र दुचाकी चालविणारा चोरटा पळून जाण्यास यशस्वी ठरला. नागरिकांनी एका संशयित आरोपीला मारहाण केल्याने त्याला बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. पळून गेलेला चोरटा ‘अपना घर’जवळील डोंगराळ भागात लपून बसला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या साह्यायाने त्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले.

चोरट्यांचा अन्य काही प्रकरणांत सहभाग
भाटीवाडा पर्रा बार्देश येथे 28 फेब्रुवारी 2025 आणि कारास्कोवाडा पर्रा बार्देश येथे 17 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंगळसूत्र हिसकावून पळून प्रकरणात संशयितांचा सहभाग आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
मेरशी येथे 17 एप्रिल 2025 रोजी सोनसाखळी हिसकावून पळून जाण्याच्या प्रकरणामध्येही संशयितांचा सहभाग आहे. सुमारे 95 हजार रुपये किमतीची सोनसाखळी त्यांनी पळविली होती, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

मंगळसूत्र चोरी प्रकरणी निलंबित आयआरबी पोलीस आता बडतर्फ
राज्यातील दोन गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या निलंबित आयआरबी पोलीस शिपाई निकेश च्यारी याला आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोरगाव येथील एका अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणामध्ये आयआरबी पोलीस शिपाई निकेश च्यारी याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. गुरुवारी तोरसे येथे एका महिलेच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणामध्ये निकेश च्यारी याला मोपा पोलिसांनी अटक केली होती. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी निकेश च्यारी याच्याविरोधात चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश काल जारी करण्यात आला.