भाजपने ५०-५० फॉर्म्युल्याचे वचन दिले नव्हते ः फडणवीस

0
96

>> शिवसेना संतप्त, भाजप सोबतची बैठक रद्द

भारतीय जनता पक्षाने ५०-५० च्या फॉर्म्युल्याचे वचन कधीच दिले नव्हते असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त होत काल शिवसेना-भाजप यांच्यात मंत्रिमंडळ स्थापनेसंबंधी होणारी बैठक रद्द केली.

शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने कधीच दिलेले नव्हते, असे स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद मिळण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावर माझ्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही, असे फडणवीस पुढे म्हणाले. तरीही राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काल होणारी शिवसेना-भाजपची मंत्रिमंडळ स्थापनेची बैठक रद्द केली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बैठक रद्द झाल्याचं जाहीर केले.

अमित शहांचा दौरा रद्द
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज मुंबईत येणार होते. शहा मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार होते. मात्र त्यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला आहे. यामुळे तूर्तास शहा-ठाकरे भेट टळली आहे.