>> फोंडा मतदारसंघ पोटनिवडणूक; विश्वनाथ दळवी यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये बंडाळीची चिन्हे; आपतर्फे गीतेश नाईक
गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर फोंडा पोटनिवडणुकीसाठी काल भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच आम आदमी पक्षातर्फे गीतेश नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, भाजपकडून दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आली होती, त्यात विश्वनाथ दळवी यांचेही नाव होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज बनले आहेत. विश्वनाथ दळवी यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काल सकाळी भाजपने रितेश रवी नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर रितेश नाईक यांनी फोंडा येथील झरेश्वर देवस्थानात जाऊन श्रींचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रॉय नाईक, आनंद नाईक, रुपक देसाई, सरपंच नावेद तहसीलदार व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर रितेश नाईक यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली.
यावेळी बोलताना रितेश नाईक यांनी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य भाजप नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्धल आभार व्यक्त केले. मतदारसंघात स्व. रवी नाईक यांची उणीव असली तरी कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करणार आहेत. मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. कुर्टी पंचायत व फोंडा पालिका क्षेत्रातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरूच होते. त्याचा निश्चित फायदा होईल, असेही रितेश नाईक म्हणाले.
उमेदवारी अर्जांसाठी सोमवारपर्यंत मुदत
फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सोमवार दि. 23 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 24 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे.
फोंड्याचा गड भाजप राखणार का?
फोंडा मतदारसंघात 2022 साली रवी नाईक यांच्या रुपाने भाजपने प्रथमच विजय प्राप्त केला होता. पण रवी नाईक यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचे सुपुत्र रितेश नाईक हे आता फोंड्याचा गड राखून ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विश्वनाथ दळवी नाराज; बंडखोरीची शक्यता
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही तासांतच नाट्यमय घडामोडी घडल्या. विश्वनाथ दळवींना उमेदवारी नाकारल्याने नाराज बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यानंतर लगोलग भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विश्वनाथ दळवी व अन्य कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. पुढील दोन-तीन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दामू नाईक यांनी त्यांना दिले; पण नाराज भाजप कार्यकर्त्यांमुळे पक्षात बंडखोरी निश्चित मानली जात आहे.
भाजपच्या गोवा प्रदेश निवडणूक समितीने फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी यांच्या नावाची शिफारस केली होती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रितेश नाईक यांच्या नावाला मान्यता दिल्याने विश्वनाथ दळवी नाराज बनले आहेत.
फोंडा पोटनिवडणुकीपूर्वी गुरुवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळी रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांनी विश्वनाथ दळवी यांच्या घरासमोर धडक दिली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी विश्वनाथ दळवी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी पहिल्यांदा चर्चा केली. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाकडे चर्चा केली. नाराज कार्यकर्त्यांनी पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्याची मुदत विश्वनाथ दळवी यांना दिली आहे.
2 दिवसांत तोडगा काढणार : नाईक
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पुढील दोन दिवसांत याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. विश्वनाथ दळवी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. त्यामुळे निश्चितच वाद संपुष्टात येईल, असा विश्वासही त्यांनी केला. दरम्यान, विश्वनाथ दळवी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होणार नसल्याचे सांगितले.
दळवी आज भूमिका स्पष्ट करणार
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्याने आपणाला धक्का बसला आहे. आपणाला पोटनिवडणुकीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी किमान 12 तासांचा अवधी हवा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ दळवी यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दामू नाईक यांनी आपली भेट घेऊन विचारविनिमय केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. आपण भूमिका अजून निश्चित केलेली नाही. आत्ताच आपण काही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.
अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार?
विश्वनाथ दळवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करावी, असा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी सध्या घेतला आहे. भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विश्वनाथ दळवी यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी दाखल करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे यासंबंधी चर्चा करून तोडगा काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या निर्णयामुळे धक्का बसला : दळवी
भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या रितेश नाईक यांना पाठिंबा देणार का, या प्रश्नावर बोलताना विश्वनाथ दळवी म्हणाले की, आपण भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पण भाजपने उमेदवारी जाहीर करताना घेतलेल्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून गेली कित्येक वर्षे फोंड्यात काम करीत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आपण बाळगून होतो.