इराण – अमेरिका युद्धाची समीकरणे दिवसागणिक बदलताना दिसतात. दोन्हींमध्ये युद्धविराम आणि समेटाची बोलणी सुरू असतानाच अचानक इराणने कुवेत आणि बहरीनवर क्षेपणास्त्र हल्ले चढवले. अमेरिकेनेही इराणच्या क्वेशम बेटावर हवाई हल्ले चढवले. एकीकडे बोलणी सुरू असताना दुसरीकडे अशा प्रकारचे हल्ले चढवण्याचा हा प्रकार पाहता ही बोलणी कितपत फळाला येतील ह्याविषयी साशंकता निर्माण होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांना ही बोलणी ठप्प होण्यास जबाबदार धरले आणि त्यांच्याशी त्यांचे झालेले संभाषण अक्षरशः शिवीगाळीवर उतरलेले पाहायला मिळाले. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले चालू ठेवले आहेत आणि त्याकडे बोटे दाखवून इराणने अमेरिकेशी चाललेल्या वाटाघाटी थांबवल्या. त्यामुळे ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी इस्रायललाही खडे बोल सुनावले. इराण – अमेरिका युद्धाच्या निमित्ताने इस्रायल आपले हिशेब पूर्ण करू पाहतो आहे. हमासने इस्रायलवर चढवलेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये हमासच्या नायनाटाची मोहीम इस्रायलने उभारली असता इराणचे हे हिज्बुल्लापासून हौथीपर्यंतचे हस्तक सक्रिय झाले होते. त्यामुळे ह्या युद्धाच्या निमित्ताने आपल्याला असलेला लेबनॉनमधील हिज्बुल्लाचा धोका समूळ संपवून टाकण्याचा विडा इस्रायलने उचलला आहे आणि त्यासाठीच त्यांची निर्णायक कारवाई चालली आहे. अमेरिका – इराण युद्ध सुरू राहते की संपते ह्याची फिकीर न करता इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये आपली जमिनीवरील कारवाई सुरू ठेवली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु इस्रायलच्या कारवाईमुळे नाराज होऊन इराणने बोलणी थांबवण्याचा प्रयत्न केल्याने ट्रम्प नाराज झाले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी नेतन्याहू यांची फोनवर खरडपट्टी काढली. परंतु लेबनॉनमधील इस्रायलची कारवाई हे इराणसाठी केवळ निमित्त आहे. आपल्या आण्विक कार्यक्रमावर अमेरिका आणू पाहत असलेले नियंत्रण आणि निर्बंध यापासून सुटका कशी करून घेता येईल त्याचे आडाखे इराण बांधतो आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीला मोकळे करण्याने सध्याचा हा पेच सुटू शकेला का ह्याची चाचपणी तो करतो आहे. परंतु अमेरिकेला ह्या निमित्ताने इराणचे समृद्ध युरेनियम हवे आहे. खरे तर इराणपाशी आण्विक शस्त्रास्त्रे असल्याचा कोणताही पुरावा अद्याप जगासमोर आलेला नाही, परंतु तो बागुलबुवा दाखवून अमेरिकेने हे युद्ध पुकारले आहे आणि आता ते संपवण्यासाठी तोंडदेखली का होईना इराणच्या अणु कार्यक्रमावर कारवाई करणे त्यांना भाग पडते आहे. अमेरिकेचे मित्रदेश ट्रम्प यांनी प्रयत्न करूनही ह्यावेळी त्यांच्यासोबत नाहीत. मात्र, इराण – अमेरिका संघर्षामुळे तेलाचे दर कडाडल्याने अवघ्या जगाला त्याचा फटका बसला. गेले काही दिवस युद्धविराम झाल्याने तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरल्या, परंतु आजवर झालेला तोटा एवढा प्रचंड आहे की जगभरातील तेल कंपन्या दर उतरवायला तयार दिसत नाहीत. अमेरिकेला एकीकडे युद्धखोरी आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने ह्यातून निवड करायची आहे. इराणशी आण्विक विषयांवर चाललेली बोलणी तांत्रिक स्वरूपाची असल्याने त्यांना वेळ लागेल असे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबिओ नुकतेच म्हणाले आणि ते खरेही आहे. त्यामुळे सध्याच्या युद्धविरामात ही बोलणी पुढे नेऊन युद्धातून सन्मानजनक माघार घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. इस्रायलची लेबनॉनविषयक भूमिका त्यातील अडसर ठरल्याने इस्रायल आणि लेबनॉनदरम्यान बोलण्यांची दुसरी फेरी वॉशिंग्टनमध्ये आयोजिण्यास अमेरिकेने नुकताच पुढाकार घेतला. बैरूतवर इस्रायल हल्ले करणार नसेल तर आम्ही इस्रायलला लक्ष्य करणार नाही असे हिज्बुल्ला म्हणत आहे, परंतु इस्रायलने केवळ बैरुतला वगळण्याची तयारी दर्शवलेली आहे. प्रत्यक्षात दक्षिण लेबनॉनमध्ये खोलवर इस्रायली फौजा घुसलेल्या आहेत आणि तेथे हिज्बुल्लाचा नायनाट केल्याविना त्या परतणार नाहीत. कुवेत आणि बहरीनवरील इराणच्या हल्ल्याने आखातामध्ये नवी समीकरणे घडू लागली आहेत. संयुक्त अरब अमिरातीने सर्व आखाती राष्ट्रांना इराणविरुद्ध एकत्र येण्याची आणि संयुक्त प्रतिकार करण्याची हाक दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीसारख्या कोणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या देशालाही इराणने युद्धात ओढले आणि अमेरिकेचे तळ असलेल्या प्रत्येक आखाती देशाला इराण लक्ष्य करीत राहिला आहे. त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवून इराणविरुद्ध आखाती देश एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर हे युद्ध वेगळ्या वळणावर जाईल. त्यामुळे सध्याचा युद्धविराम आणि बोलणी ह्यातून शांततेला चालना मिळाली पाहिजे. जगाला आज तिची गरज आहे. अमेरिकेची भूमिका अर्थातच त्यात महत्त्वाची सेल.