चार पर्यटकांचा मृत्यू, 50 जणांना वाचवले
काल रविवारी पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत एकूण 50 जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही पूल दुर्घटना घडली. या पुलाखाली एक लहान मुलगा अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेमध्ये अजूनही 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे.
कोसळलेला पूल हा सुमारे 30 वर्षे जुना असून तो गंजलेल्या अवस्थेत होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यंटकांनी कुंडमाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्यावेळी इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला त्यावेळी पुलावर 100 पर्यटक असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे.
इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल गंजलेला होता, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे पवार म्हणाले.
रविवारमुळे पर्यंटकांची गर्दी
कुंडमळा हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही.
पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
एनडीआरएफच्या जवानांनी हा पूल मधोमध कापला. या पुलाखाली एक मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आले. आणखी एक व्यक्ती पुलाच्या खाली दबला असून त्यालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांचा उपचाराचा खर्चही सरकारकडून केला जाणार आहे.