पाकिस्तानचा उद्दामपणा सुरुच…

0
140
  • शंभू भाऊ बांदेकर

तुम्ही शांततामय बोलणे करा, सामंजस्य करार करा, व्यापारउदिम वाढवा, दळणवळण चालू ठेवा, पण पाकिस्तानला वळणावर आणण्यासाठी, त्यांच्या उद्दामपणाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असेच म्हणावेसे वाटते!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपविली आहे. जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांतील दहशतवाद मोडून काढण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवाय पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, उडिसा, झारखंड, बिहार आणि महाराष्ट्र राज्यातील नक्षलवाद मोडून काढण्याचे महत्त्वाचे कामही शहा यांना युद्धपातळीवर करायचे आहे.

अशा या पार्श्‍वभूमीवर मोदी यांची दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दूरध्वनी करून अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली. स्तुत्य अशीच ही गोष्ट आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे याची मात्र पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत आहे.

याबाबत ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर २ जून रोजी इस्लामाबाद येथे भारतीय दूतावासातर्फे पार पडलेल्या इफ्तार मेजवानीतील पाहुण्यांना पाकिस्तानी पोलिसांनी धमकावले, हुसकावून लावले, त्याचे देता येईल. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ‘इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात आयोजित इफ्तार मेजवानीत येणार्‍या पाहुण्यांना पाकिस्तानी यंत्रणांकडून धमकावण्यात आले आणि त्यांना माघारी पाठविण्यात आले.’ इतकेच नव्हे तर त्यांना अपमानास्पद वागणूकही देण्यात आली. अशी माहिती पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय विसारिया यांनी दिली आहे.
भारतीय दूतावासातर्फे इफ्तार मेजवानीसाठी निमंत्रित केलेल्या शेकडो पाहुण्यांना पाकिस्तानी यंत्रणांनी गुप्त क्रमांकावरून फोन केले आणि धमकावले. ‘इफ्तार पार्टीस आल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी त्यांना देण्यात आली. हे सारे ‘याचि देही, याचि डोळा’ घडले असताना सामंजस्याचा, तडजोडीचा व सौहार्दाचा हात पुढे करताना आपल्या सरकारने गंभीरपणे विचार नको का करायला? नपेक्षा अनेक वर्षे जे सामंजस्याचे, मैत्रीचे गुर्‍हाळ चालू आहे, तेच मागील पानावरून पुढे चालू ठेवायचे का? याचाही विचार नको का व्हायला? की ‘आले अंगावर, घेतले शिंगावर’ असा यावेळीही आगंतुकपणा करायचा? यावर अत्यंत खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे, कारण शेवटी पाकिस्तानरूपी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. नळीत घालून ते सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच सरळ होत नसते. आपला शेजारील शत्रू असलेल्या पाकिस्तानचीही तीच गत आहे. पाकला कितीही मदत केली, सामंजस्याची, मैत्रीची भाषा केली, तरी ज्याच्या नियतीतच खोट आहे, ती नियती खोटारडी आहे हे ते कसे बरे सिद्ध करणार? पाकिस्तानच्या या अनीतीमुळेच हा देश जगाच्या राजकारणात एकटा पडत चालला आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने पाकिस्तानच्या राजकारणात लोकशाहीवर विश्‍वास आहे, असे टाहो फोडून सांगणारेही पंतप्रधान झाले, पण त्यांची नियतीच खोटी असल्यामुळे ते जनतेच्या विश्‍वासास पात्र ठरू शकलेले नाहीत.

आता भारत – पाक संबंधाबद्दल सांगायचे झाले तर गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध ‘प्रॉक्सी वॉर’ छेडले आहे. पाकिस्तानकडून होणार्‍या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भाषा भारतीयांतर्फे आजवर अनेकदा केली गेली. जनताही ते ऐकून ऐकून कंटाळली. जणू ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ अशीच ती चाल होती. मात्र उरीवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, या हल्ल्याला प्रतिहल्ल्याने चोख उत्तर देऊ असे ठणकावून सांगितले. त्यानुसार मग २०१६ साली रात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले आणि तेथील काही अत्यंत महत्त्वाचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, काही दहशतवाद्यांनाही कंठस्नान घातले. हा भारताने गेल्या २५-३० वर्षांच्या काळात दिलेला पहिला जबरदस्त दणका होता. त्या कारवाईमुळे भारतीय जनतेने केंद्राचे अभिनंदन केले व अशीच इच्छाशक्ती बाळगली, तरच पाकिस्तान वठणीवर येऊ शकतो, असे उद्गार काढले. त्याचा परिणाम असा झाला की, काही घडलेच नाही, अशी बतावणी करण्याचे काम प्रथम पाकिस्तानी सैनिकी अधिकार्‍यांनी केले, पण ‘चक्षुर्वै सत्यम’ जगासमोर आल्यानंतर त्यांना वस्तुस्थितीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

खरे तर, आजपर्यंत ‘बोलाची कढी, बोलाचाच भात’ अशाप्रकारे कारभार सुरू होता. केवळ चर्चा होत होती. चर्चा चालू असली तरी पाकिस्तानकडून छुपे हल्ले होतच होते. चर्चेत शांततेचा भंग नको म्हणून भारतही मूग गिळून गप्प बसत होता. मनात असूनही प्रत्यक्ष पाऊल उचलले जात नव्हते. पण नंतर केवळ शांततामय बोलण्यावरच विश्‍वास न ठेवता जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले व पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटची कारवाई झाली. त्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाक नरमला; पण पाक नरमला, वरमला तरी ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ हे धोरण आपले पूर्ण मरण ओढवेपर्यंत ते कायम ठेवणार तर नाहीत ना, अशी शंकेची पाल चुकचुकते. त्याला अर्थातच त्यांची दुटप्पी नीतीच कारणीभूत आहे, हे सांगायला नको.

आपण पाकिस्तानचा एकूण अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येते की, एकीकडे वाटाघाटीची भाषा करायची, दुसरीकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कुरापती सुरु ठेवायच्या आणि दहशतवाद्यांना पोसण्याचा, त्यांचे चोचले पुरवण्याचा आणि त्यांना भारताविरुद्ध चिथवण्याचा प्रयत्न सुरू ठेवायचा असे सर्रास चालू आहे.

पाकिस्तानने जगाकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजही त्यांना वेळेवर भरता येत नाही. अर्थात भारतीयांचीही आर्थिक बाजू बरी आहे, असेही नाही, पण पाकिस्तानबाबत अमेरिका, सौदी अरेबिया, चीनने पाकिस्तानच्या एकूण धोरणाचा अभ्यास करून मदतीचा हात आखडता घेतला, तरी पाकिस्तानला अजून जाग आलेली दिसत नाही. आपण जसे कर्ज काढून उत्सव साजरे करायचे, असे म्हणतो, त्याप्रमाणे कर्जबाजारी झालो, तरी भारताला अद्दल घडवायचीच, हीच जणू त्यांची नियत होऊन बसली आहे. यापुढे पाकिस्तानचा उद्दामपणा असाच सुरू राहिला तर त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही आणि म्हणून तुम्ही शांततामय बोलणे करा, सामंजस्य करार करा, व्यापारउदिम वाढवा, दळणवळण चालू ठेवा, पण पाकिस्तानला वळणावर आणण्यासाठी, त्यांच्या उद्दामपणाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असेच म्हणावेसे वाटते!