पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

0
514
  •  प्रा. रमेश सप्रे

‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची न्यायालयात केलेली सिंहगर्जना, ‘स्वराज्य हा माझा …’. याशिवाय लो. टिळकांच्या जीवनाच्या पत्रकार पैलूंचं दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न. खरं ही त्या नरकेसरीला कृतज्ञ श्रद्धांजली! अन् त्यांच्या ज्वलंत स्मृतीला नम्र अभिवादन!

कार्यक्रम होता एका वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा. श्रोत्यात वाचन- चिंतन केलेल्या विचारवंतांची संख्या लक्षात येण्यासारखी होती. वृत्तपत्राच्या मालक असलेल्या संपादक महाशयांनी मोठ्या झोकात प्रास्ताविक केलं. दीपावली अंकाचं दिमाखात प्रकाशनही झालं. आता पाळी होती ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्या अध्यक्षमहोदयांच्या भाषणाची. त्यांनी वृत्तपत्राच्या मालक- संपादकाला सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात विचारलं, ‘‘मनातलं मनापासून मनसोक्त बोलू ना?’’ प्रश्‍नातच होकारार्थी उत्तर होतं.
अध्यक्षांनी मुद्यालाच हात घातला. ‘‘पुन्हा या ठिकाणी आपल्याला बोलावलं जाणार नाही हे लक्षात घेऊनच मी बोलणार आहे. आत्ता ज्या संपादकांनी टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेचा, त्यांच्या तेजस्वी परंपरेचा उल्लेख केला ते टिळक-आगरकर कोणत्या युगातले? सत्ययुगातले का? कलियुगातले असतील तर ते या पृथ्वी नावाच्या ग्रहावरचेच आहेत ना?.. कारण त्यांची नावं घेऊन सध्याची पत्रकारिता चालवणं हा त्यांचा अपमान का? … मृत्यूपूर्वीच आगरकरांची प्रेतयात्रा काढली होती. कारण त्यांचं ‘सुधारक’ या पत्रातलं रोखठोक लेखन. लो. टिळकांचा ‘केसरी’ काही कमी जहाल नव्हता. ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ अशी शीर्षक त्यांच्या केसरीतील अग्रलेखांची असत. अशा थेट टीकेमुळे त्यांना भारताबाहेरच्या ब्रह्मदेशातील (आत्ताच्या म्यानमारमधील) मंडाले येथील तुरुंगात जावं लागलं होतं. तो नरकेसरी तिथंही गर्जना करत राहिला. वनगर्जना नव्हे तर रणगर्जना. रण तरी कुठलं – कुरूक्षेत्रावरचं.

‘गीतारहस्य’ ग्रंथ कारावासात जन्माला आला. ज्या ‘भगवान’ कृष्णानं गीता सांगितली त्याचा जन्मही कंसाच्या कारागृहातच झाला नव्हता का? – तिथून सुटून आल्यावर पुन्हा केसरीत गरजताना आरंभीच्या अग्रलेखाचं शीर्षक होतं ‘पुनश्च हरिः ॐ’’.
त्यांच्या पत्रकारितेचं स्वरूप ज्वलंत क्रांतिकारकाचं होतं. देशाचं स्वातंत्र्य स्वप्न नि ‘सत्य-असत्यासी मन केले ग्वाही’ हा तुकोबांचा बाणा यातून विचारांचे अंगार बाहेर पडत होते. समाज पेटून उठत होता. मत्सरी मंडळींनी त्यांना ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून हिणवलं पण तेच भूषण मानून लो. टिळकांनी आपलं समाजातील जन-सामान्यांची मनं पेटवण्याचं काम सुरूच ठेवलं.

शंकराच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते, जी गोष्ट बहुसंख्यांच्या मते कलंक असलेली, दूषणास्पद, भयंकर अशी असते ती शिवशंकराचा स्पर्श झाल्यावर दूषणाची नुसती भूषणच नव्हे तर आभूषण ठरते. माथ्यावरचा वाकडा चंद्र (वक्र चंद्रकोर) पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापेक्षा सुंदर दिसतो. कंठातील सर्पमाळा विष्णूच्या गळ्यातील वैजयंतीमालेपेक्षा देखण्या दिसतात. आणि तो निळा कंठ त्या कर्पूरगौर तनूला एक विशेष लावण्याचं मूल्य देतो.

लो. टिळकांचं असंच होतं. हा तेल्यातांबोळ्यांचा पुढारी पुढे ‘भारतीय असंतोषाचा जनक’ ठरला. ब्रिटिश सरकारनं त्यांच्या लेखन- भाषणातून फुटणार्‍या विचारठिणग्यांची धास्तीच घेतली होती. त्यांना भारतीयांच्या मनात त्यांच्या म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध असलेला खदखदणारा विरोध कळावा म्हणून या नरकेसरी संपादकानं ‘मराठा’ नावाचं इंग्रजी भाषेतलं पत्र सुरू केलं. ‘हे हृदय नसे परि स्थंडिल धगधगलेले’ म्हणजे हृदयात (मनात) धगधगणारं यज्ञकुंड आहे ज्यात पडणारी विचाराची प्रत्येक आहूती भारताच्या स्वातंत्र्याला जवळ आणणारी आहे. हा भाव मनात जागता असलेलं त्या काळातल्या वृत्तपत्रसृष्टीतलं त्रिकुट म्हणजे लो. टिळक, आगरकर नि विष्णुशास्त्री चिपळुणकर.

ज्यावेळी प्लेगचं थैमान भारतात सुरू होतं तेव्हा ज्या अमानुष पद्धतीनं लोकांच्या संसारातील सामान घराबाहेर लोकांना गावाबाहेरच्या शेतात स्थलांतर करावं लागलं आणि रँडसारखा पाषाणहृदयी अधिकारी हे अत्याचार जातीनं नि स्वतःच्या साक्षीनं करत होता त्यावेळी त्याच्याविरोधात जनमत आणि युवकांची मनं प्रज्वलित करण्याचं काम टिळकांच्या तलवारीपेक्षा धारदार लेखणीनं केलं होतं. याचाच परिणाम म्हणून चाफेकर बंधूंनी, रँड साहेब नि त्याच्या सहायकाची- आयर्स्टची हत्या केली. याची प्रेरणाच नव्हे तर योजना लो. टिळकांनी केली असा खोटा आरोप करून लो. टिळकांवर खटला भरण्यात आला. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करण्यात आला. त्यात लो. टिळकांना दीड वर्षं सक्तमजुरीची शिक्षा दिली. सिंहावर गवत खाण्याची सक्ती करावी तशी अवस्था लो. टिळकांची तुरुंगातलं घाणेरडं अन्न (कदान्न) आणि इतर हालअपेष्टांमुळे झाली. पण याही कारावासात टिळकांच्यातील संशोधक विचारवंत स्वस्थ बसला नाही. जर्मन विद्वान नि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या प्रो. मॅक्सम्यूलर यांनी पाठवलेल्या ऋग्वेदाच्या प्रतीच्या आधारे टिळकांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ऋग्वेद काळात आर्यांचं मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशात असलं पाहिजे. या चिंतनावर आधारित ऋग्वेदाच्या काळाविषयी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला ‘ओरायन’. यामुळे जगातील विद्वानांच्या वर्तुळात टिळकांना मानाचं स्थान प्राप्त झालं. इतकं की याच मॅक्सम्यूलरनी आणि विदेशी पंडितांनी महाराणी व्हिक्टोरियाकडे लो. टिळकांच्या सुटकेसाठी अर्ज करून विनंती केली. याचा परिणाम होऊन काही अटींवर लो. टिळकांची सुटका केली गेली.

स्वतः वकील असलेल्या लोकमान्यांवर खोटे आरोप करून ब्रिटिश सरकारनं त्यांना एका खटल्यात गुंतवून एक-दोन नाही चोवीस वर्षं त्यांचा मानसिक छळ केला. त्यांचं चारित्र्यहनन करणं, त्यांच्या कार्याबद्दल खोटेनाटे वृत्तांत प्रसिद्ध करून जनमानसात संशय निर्माण करणं असे अनेक मनस्ताप देणारे प्रकार केले. कोणताही सामान्य माणूस या कालखंडातील मानहानी आणि क्लेश यांच्यामुळे खचून गेला असता किंवा वेडा झाला असता.

पण गीतेचं कर्मयोगी रहस्य जाणणार्‍या धैर्यवान, करारी लोकमान्यानं या अग्निदिव्यानं नवी झळाळी मिळवून दिली. ते या दिव्यातून यशस्वीपणे आणि सन्माननीय रीतीने बाहेर पडले. या प्रकरणाला ‘ताईमहाराज प्रकरण’ म्हटलं जातं. पण या सार्‍यातून तावूनसुलाखून निघालेल्या लो. टिळकांनी केसरीत लिहिलं- ‘अखेर खरे तेच टिकले.’
आणखी लो. टिळकांची सर्वदूर दृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि बेधडक कृती व्यक्त करणारा एक प्रसंग घडला. ती जागतिक इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना होती. १९०४ साली रशिया नि जपान यांच्यात झालेल्या युद्धात जपान्यांचा विजय झाला. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की संघटित नि युनियोजित प्रयत्न केले तर एक आशियाई देश एका युरोपियन देशाचा पराभव करू शकतो. अतिशय सजग नि सावध असलेल्या लो. टिळकांमधील पत्रकाराला यात भावी इतिहासाची नांदी दिसली नसली तरच नवल. पुढे सुभाषचंद्र बोस या द्रष्ट्या नि कणखर नेत्यानंही याच दृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन जापान्यांच्या साह्यानं ‘आजाद हिंद सेनेचा’ पुरूषार्थी प्रयोग केला.

समविचारी व्यक्ती एकत्र येतात. पण विचारवंत नि बुद्धिमान, स्वाभिमानी बाण्याचे नि स्वतंत्र मताचे असल्याने ते कायम एकत्र राहतातच असं नाही. लो. टिळक नि समाज-सुधारक आगरकर या जिवाभावाच्या मित्रांचंही असंच झालं. डेक्कन कॉलेजमध्ये वर्गबंधू असलेल्या या द्वयीनं केसरी-मराठा या अनुक्रमे मराठी- इंग्रजी वृत्तपत्रातून खांद्याला खांदा लावून समाजप्रबोधनाचं कार्य केलं. इतकंच नव्हे तर देशाभिमानी जनता तयार करण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्यासाठी शिक्षणसंस्थाही सुरू केल्या. न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय, फर्ग्युसन कॉलेज हे महाविद्यालय आणि अशा शिक्षणसंस्थांची साखळी निर्माण करण्याच्या उद्देशानं ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ नावाची कायम स्वरुपाची संस्था सुरू केली. त्यात वेतनाऐवजी मानधन आणि नोकरी ऐवजी सेवाभावानं शपथपूर्वक काम करणार्‍या जीवनव्रतींची (लाइफ मेंबर्स) भरती केली. शिक्षणक्षेत्रात या संस्थांनी नवे कीर्तिमान निर्माण केले. महाविद्यालयात तर टिळक- आगरकर यांच्यासारखे देशहितासाठी कटिबद्ध असलेले प्राध्यापक होते.

दुर्दैवानं पुढे लो. टिळक आणि आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद पराकोटीला पोचले. मुद्दा होता ‘आधी स्वराज्य की सुराज्य?’ दोघंही विचारवंत असल्याने दोघांना आपली बाजू योग्य वाटायची. लोकमान्यांच्या मते आधी ‘स्वराज्य’ मिळवू या नि एकदा सत्ता भारतीयांच्या हातात आली की शिक्षण, प्रबोधन, मार्गदर्शन या मार्गांनी चारित्र्यवान नेत्यांच्या माध्यमातून, त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून समाजसुधारणा करून सुराज्य स्थापन करु या.
आगरकरांच्या मते एकदा ‘स्वराज्य’ मिळवलं की जनतेला ‘सुराज्या’चं महत्त्व वाटणार नाही. आणि आज चारित्र्यवान नेते आहेत पण पुढे नेतृत्वाचा सत्तेमुळे अधःपात होणार नाही कशावरून? म्हणून ब्रिटिशांविरोधात आपण लेखन-भाषणातून तापवलेली बहुजन-समाजाची मनं नि मतं पेटलेली असतानाच ‘सुराज्या’च्या दिशेनं वाटचाल करु या. म्हणजे स्वराज्य मिळाल्यावर जनतेत उन्मादाऐवजी उमेद येईल. स्वातंत्र्याला अमृतफळं लागतील.

दोघेही द्रष्टे होते. दोघांंचं मिळून जे सत्त्व तयार झालं असतं ते झालं नाही. समाजसुधारक आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ नावाच्या वृत्तपत्रातून केलेल्या वैचारिक जागृतीमुळे समाजातील एक वर्ग दुखावला केला नि जिवंतपणी प्रेतयात्रा नव्हे मरणयात्रा त्यांना सहन करावी लागली. ‘टिळक -आगरकर’ अशी नावं ‘केशवायनमः नारायणायनमः’च्या चालीवर त्यांनीच घ्यावीत ज्यांचा कणा ताठ आहे आणि ज्यांच्याकडे वैचारिक संपन्नता आणि काही मूल्यांविषयी प्रतिबद्धता आहे. येरांनी (म्हणजे इतर पत्रकारांनी, संपादकांनी) स्वतःचा किंवा एकमेकांचा उदोउदो करून घ्यावा. ‘गाढवानं उंटाच्या रुपाची स्तुती करायची नि उंटानं गाढवाच्या आवाजाची. अहो रुपम्, अहो ध्वनिम्‌|!
– अध्यक्षमहोदयांनी लो. टिळक नि आगरकरांसारख्या पत्रकारितेचं सतीचं वाण घेतलेल्या संपादकांच्या कार्याचा आलेख श्रोत्यांसमोर ठेवला.

… नंतर नम्रपणे म्हणाले, ‘‘काळाप्रमाणे सर्वच क्षेत्रातील मापदंड नि मानदंड बदलत जातात. वृत्तपत्रांचं क्षेत्र याला अपवाद नाही. प्रत्येक काळाची – कालखंडाची – गरजही वेगळी असते. आज स्वराज्याविषयी लिहिण्याची आवश्यकता नाही. कारण ते मिळून सात दशकं होऊन गेली. पण उलटा विचार केला तर आजही पूर्ण स्वराज्याची प्रतिष्ठापना झालेली नाही. कदाचित ही फार आदर्श गोष्ट वाटेल. पण सत्तर वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेले आपण आज तेवढे स्वतंत्र आहोत का? मातृभाषेचीच नाळ जर केवळ शिक्षणात नव्हे तर इतर अनेक व्यवहारात कापली गेली असेल तर मातृभूमीवरील प्रेमाचं संगोपन कोण करणार? चंगळवादाच्या भुलभुलैय्यात नि समाजमाध्यमांच्या ऑक्टोपसी विळख्यात बहुसंख्य जनता सापडली असताना स्वतंत्रपणे देशहिताचा, समाजकल्याणाचा विचार करू शकणारी मंडळी कोण तयार करणार? वाचन संस्कृती जवळजवळ लुप्त झाल्याच्या काळात वाचनसाधनेचं पुनरुज्जीवन कोण करणार?
आजही सर्व भाषांतील वृत्तपत्रांची संख्या नि वाचक वर्ग वाढतोय. विचारमंथन घडवून विचार परिवर्तन घडवण्याची वृत्तपत्रांची क्षमता इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा कितीतरी अधिक प्रभावी नि विश्‍वासार्ह आहे. त्याचा योग्य लाभ करून घेण्याची जबाबदारी वृत्तपत्र मालकांपेक्षा संपादकांवर आहे. अर्थात संपादकांना मुक्त लेखन स्वातंत्र्य आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची ठाम नि स्वतंत्र मतं असणं आवश्यक आहे.’’
लोकमान्य टिळकांना लोकमान्यता त्यांच्या वृत्तपत्राविषयीच्या निष्ठेमुळे मिळाली. राजमान्यता म्हणजे रावबहादूर सारख्या पदव्या किंवा अलीकडे असलेली पद्मश्री- पद्मभूषण यासारखी बिरुदं त्यांना मिळणं शक्यच नव्हतं. पण त्यांच्या केसरीचं ध्येयवाक्यच होतं -‘न मे कर्मफले स्पृहा’ म्हणजे मला कर्मफलाची इच्छाअपेक्षाच नाहीये. आणखी एक गोष्ट अगदी मनाच्या गाभार्‍यातली सांगतो असं म्हणून अध्यक्षांनी समारोप करताना म्हटलं, ‘‘वृत्तपत्राचा संपादक हा व्यासंगी, चतुरस्त्र वाचक नि समाजजीवन चिंतक असला पाहिजे. नुसतं वृत्त नि वृत्तांत यांचं लेखन करून भागणार नाही. बरोबरीला स्वतंत्र चिंतन असलेलं नि मूलभूत संशोधनाच्या अंगानं जाणारं लेखनही करायला हवं. जसा लोकमान्यांच्या ग्रंथत्रयीतला ओरायन, गीतारहस्य यांच्यासारखा ग्रंथ ‘द आर्क्टिक होम इन द वेदाज्’ (वेदकाळातील आर्यांचं (सुसंस्कृत लोकांचं) उत्तर ध्रुवाकडील मूळ वसतिस्थान). इतकी उंची ज्ञान, विचार, संशोधन यांच्याबाबतीत सर्व संपादकांना गाठता येणार नाही. पण त्या दिशेनं प्रयत्न करणं अनिवार्य आहे. असो.’’
असं बोलून अध्यक्षमहोदय खाली बसले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट शांत झाल्यावर पुन्हा एकदा उठून पत्राला जसा ताजा कलम (ता.क.) असतो तसं म्हणाले- ‘‘दिवाळी अंकाच्या प्रकाशनात अध्यक्षांनी हे कोणते दिवे लावले असं तुम्हा श्रोत्यांना वाटेल पण मालक- संपादकांनी टिळक- आगरकर यांच्या संपादकीय परंपरेचा उल्लेख हे मनातलं.. मनापासून … मनसोक्त बोललो एवढंच. तशी अनुमती आधी मिळवली होतीच.’’
या लेखाचं स्वरूप काल्पनिक समारंभाचं किंवा प्रतीकात्मक असं वाटेल. पण ही सत्यकथा आहे. केवळ स्मरणरंजनात्मक बोलण्या- लिहिण्यापेक्षा जी विदारक वस्तुस्थिती, काही अपवाद सोडल्यास, आजुबाजूला पसरलेली जाणवतेय त्या संदर्भात हे मुक्तलेखन केलं एवढंच!

दरवर्षी पावसाळा नेमेचि येतो असं सध्या घडत नाही. पण दिनदर्शिकेत ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची न्यायालयात केलेली सिंहगर्जना, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे नि तो मी मिळवणारच’… याशिवाय लो. टिळकांच्या जीवनाच्या पत्रकार पैलूंचं दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न. खरं ही त्या नरकेसरीला कृतज्ञ श्रद्धांजली! अन् त्यांच्या ज्वलंत स्मृतीला नम्र अभिवादन!