निरुत्साही राहुल

0
137

गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाच्या धक्क्यातून राहुल गांधी अद्याप बाहेर पडलेले दिसत नाहीत. निवडणूक झाल्यापासून त्यांना एवढी विरक्ती आलेली दिसते आहे की, त्यांनी सर्व भगतगणांची विनंती धुडकावून आपले पक्षाध्यक्षपद सोडून तर दिले आहेच, परंतु संसदेमधील त्यांचे एकूण वर्तनही त्यांना राजकारणात आता रस उरला नसल्याचे दर्शविते आहे. एखाद्या मुलाने आपण आपले बालपण गमावले असल्याची खंत करावी, तसे एकंदर राहुल यांचे वर्तन आहे. खरे तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या आयुष्यात विजय – पराभव हे ललाटावर असतातच, परंतु एखाद्या पराभवाचा एवढा मानसिक धक्का बसणे एखाद्या नेत्यासाठी मुळीच शोभादायक नाही. रुसून बसलेल्या मुलासारखे राहुल सध्या रुसून बसलेले आहेत. त्यांचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या जवळच्या कॉंग्रेसजनांनी केला. बहीण प्रियांका, आई सोनिया यांनीही त्यांचे मन वळवण्याचे परोपरीने प्रयत्न केले, परंतु कोणालाही आणि कशालाही न जुमानता राहुल आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले दिसतात. आधीच सतत दुसर्‍या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का बसलेल्या कॉंग्रेसजनांना ही निर्नायकी स्थिती पाहून पक्षाला रामराम ठोकावा असे वाटल्यास नवल नाही. खरे तर तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका जेव्हा कॉंग्रेस पक्षाने दिमाखदारपणे जिंकल्या आणि तेथे सत्ता स्थापन केली, तेव्हा कॉंग्रेसचे मनोबल प्रचंड उंचावले होते. राहुल यांनी राफेलचा मुद्दा लावून धरत आणि चौकीदार चोर है च्या आरोळ्या ठोकत प्रचाराची धूळ उडवून दिली होती. पण मोदींनी मात केली आणि राहुल यांना तो धक्का पचवणे कठीण झाले. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडणे इथवर ठीक होते, परंतु परवा संसदेमध्ये त्यांचा जो काही बेजबाबदारपणा दिसला तो त्यांच्यासारख्या एका बड्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यासाठी निश्‍चितच अशोभनीय होता. राष्ट्रपतींचे संसदेत अभिभाषण सुरू होत असताना राहुल दीर्घकाळ आपल्या आईशी बोलत बसले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या हातच्या मोबाइल फोनमध्ये नजर खुपसली. संपूर्ण अभिभाषण संपेस्तोवर त्यांची मोबाइलवरची नजर हटली नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणांतील काही मुद्दयांना सोनिया गांधी यांनी बाक बडवून समर्थन दिले तेव्हा राहुल यांनी हात लावून सोनियांना तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचे टीव्ही कॅमेर्‍यांत स्वच्छ दिसले. ही टोकाची नकारात्मकता अनाकलनीय आहे. तेथेच ही नकारात्मक वृत्ती थांबली नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम भारतातच नव्हे, तर जगभरामध्ये साजरे होत असताना लष्कराच्या श्वानपथकातील कुत्रे आपल्या प्रशिक्षकांसमोर योग करीत असल्याची छायाचित्रे ट्वीट करून त्यांनी त्यावर ‘न्यू इंडिया’ अशी कुत्सित शेरेबाजी केली. वास्तविक लष्कराच्या श्वानपथकातील कुत्र्यांकडूनही आपल्या समोर शिस्तीत योग करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक खरोखरच कौतुकास पात्र आहेत. समोरच्या माणसाकडूनही योग करून घेणे अनेकदा कठीण होत असताना चक्क श्वानांकडून योगसदृश्य हालचाली करून घेणे हे खरोखरच सोपे नाही. त्याबद्दल या प्रशिक्षकांचे राहुल यांनी त्या छायाचित्राद्वारे कौतुक केले असते तर ते योग्य ठरले असते. परंतु राहुल यांचा उद्देश कौतुकाचा नव्हता. त्यावर त्यांनी ‘न्यू इंडिया’ अशी जी टिप्पणी केली, ती त्यांच्या कुत्सितपणाची निदर्शक आहे. कुत्री जशी प्रशिक्षकांसमोर निमूट योग करीत आहेत, तशीच भारतीय जनता मोदींमुळे मुकाट योग करीत आहेत असे काहीसे राहुल यांना त्यातून सूचित करायचे असावे. पण मोदींनी योगदिनाचा जो प्रसार चालवला आहे तो काही स्वतःसाठी नाही. योग अनुसरण्यातून जो काही फायदा होईल तो योग करणार्‍यांनाच होईल. विशेष म्हणजे मोदींनी जेव्हा संयुक्त राष्ट्रांपुढे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा त्याला जे व्यापक समर्थन जगभरातील देशांकडून लाभले, ते भारतीय परंपरेतील पाच हजार वर्षांपूर्वी विकसित झालेल्या या योगशास्त्राप्रतीची आस्था आणि उत्सुकताच दर्शविते. गेली चार वर्षे जगभरामध्ये योगाचा वेगाने प्रसार झाला आहे. ठिकठिकाणी लोक योगाभ्यास करताना दिसून येतात. अगदी संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील योगाभ्यासात तेथील प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. अशा वेळी कुत्सित शेरेबाजी करून राहुल यांनी काय मिळवले? त्या ट्वीटमधून हसे त्यांचेच झाले आहे. संसदेमध्ये मोबाईलमध्ये नजर खुपसल्याने त्यांच्याविषयीच जनतेमध्ये असलेला अविश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. पक्षाचा पराभव पचवता न आल्याने आपले पक्षाध्यक्षपद सोडून मोकळे झालेले राहुल राजकीय नेता म्हणून खरोखरच सक्षम आहेत का असा प्रश्न त्यामुळे आज देशभरामध्ये विचारला जातो आहे. आधीच गलितगात्र झालेल्या कॉंग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी मुळात त्याचे नेतृत्व स्थिर व ठाम असायला नको? राहुल यांनी हे जे काही चालवले आहे, त्यातून ते स्वतःचे नुकसान तर करून घेतलीच, परंतु पक्षाचीही कधीही भरून न येऊ शकणारी हानी करतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजावी!