गोवा विद्यापीठाच्या एकात्मिक एमबीए विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर कपडे उतरवायला लावून निव्वळ आतल्या चड्डीत फिरवण्याचा झालेला हिडीस प्रकार पाहता हे विद्यापीठ कोठल्या थराला चालले आहे असा प्रश्न पडतो. हे असले थिल्लक प्रकार निमूट खपवून घेणाऱ्या विद्यापीठ पदाधिकाऱ्यांनीही आपल्या कंबरेचे सोडले आहे काय? ह्या घटनेने गोवा विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावर छीः थू झाली आहे. गोवा विद्यापीठाची अधिकाधिक बेअब्रू करणाऱ्या घटना आजकाल सातत्याने घडत आहेत. एकीकडे विद्यापीठाचे नॅकचे मानांकन घसरत चालले आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे पार धिंडवडे निघत आहेत. दुसरीकडे विद्यापीठाची उरलीसुरली अब्रूही घसरणीला लावणारे भलतेसलते प्रकार सातत्याने घडत आहेत. मध्यंतरी एका प्राध्यापकाकडून मर्जीतील विद्यार्थिनीचे गुण वाढवण्याचा प्रयत्न उजेडात आला. विद्यापीठाने त्यावरही पांघरूण घालण्याचा तेव्हा प्रयत्न केला. शेवटी फारच गदारोळ झाला तेव्हा त्या प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली गेली. आता हे जे नवे प्रकरण उघडकीस आले आहे तो कार्यक्रम झाला होता फेब्रुवारीत. ज्या कार्यक्रमात हा हिडीस प्रकार झाला तो म्हणे ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ होता. ही नंगानाचाची कोणती संस्कृती आहे? तिचे पाईक असलेले हे कोण महान परीक्षक बोलावले गेले होते? जेव्हा गोवा विद्यापीठाच्या एखाद्या विभागाच्या नावे कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा त्याच्याशी विद्यापीठाची प्रतिष्ठा निगडीत असते. त्यामुळे तेथे काही अनुचित घडू नये हे पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागाची नक्कीच असते. ‘फ्रॉलिक’ चे आयोजन विद्यार्थ्यांनीच केले होते असे जरी गृहित धरले तरी त्या विभागाच्या प्राध्यापकांची त्यावर देखरेख नव्हती का? ह्या कार्यक्रमाला विद्यापीठाने रीतसर परवानगी दिली होती ना? मग तेथे जर काही गैर घडले असेल तर त्याचा जाब संबंधितांना विचारण्याची जबाबदारी विद्यापीठाची नव्हती काय? विद्यापीठात ह्या कोणत्या नव्या संस्कृतीला खतपाणी घातले जाते आहे? हा जो प्रकार घडला तेव्हा त्याला उबगून उपस्थित विद्यार्थिनी सभागृहाबाहेर जायला निघाल्या तेव्हा त्यांची वाट अडवून त्यांना बाहेर पडू दिले गेले नाही अशा तक्रारी आहेत आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे. पालकांनी कुलगुरूंकडे यासंदर्भात रीतसर तक्रार करूनही आजवर ह्या साऱ्या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला असेच त्यामुळे दिसते. आता सदर कार्यक्रमातील नंगानाचाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आणि राजकीय पक्षांनी व प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्याने नाईलाज झाल्यागत चौकशी सुरू झाली आहे. ह्यासंदर्भात विद्यापीठाकडून आजवर रीतसर चौकशी का झाली नाही? त्यावर पडदा ओढायचा प्रयत्न का झाला? सदर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार का दाखल केली गेली नाही? त्यांच्यावर शैक्षणिक निलंबनाची कारवाई का झाली नाही? गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ह्या तमाम प्रश्नांची उत्तरे द्यावीत. गोवा विद्यापीठ सुरू झाले तेव्हा जणू गोव्याने एक उज्ज्वल शैक्षणिक स्वप्न पाहिले होते. बी. शेखअली, पद्माकर दुभाषी अशा दिग्गज कुलगुरूंनी ह्या विद्यापीठाला तेव्हा नावलौकीक मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुर्दैवाने हे स्वप्न कधी भंगले तेही कळले नाही एवढ्या वेगाने गोवा विद्यापीठाच्या गुणवत्तेचा ऱ्हास झाला आहे. एकीकडे शैक्षणिक गुणवत्तेत चाललेली घसरण, त्यात दुसरीकडे उरलीसुरली प्रतिष्ठा रसातळाला पोहोचवणाऱ्या अशा घटना. हे गोवा विद्यापीठात काय चालले आहे? अलीकडेच विद्यमान कुलगुरूंनी प्राध्यापकांच्या गुणवत्तेसंबंधी काही बेताल टिप्पणी केली होती. त्यावरही वाद उफाळला होता. विद्यापीठ चर्चेत राहायला हवे ते गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कामगिरीसाठी. अशा शिक्षणबाह्य हिडीस प्रकारांसाठी नव्हे. मानवाधिकार आयोगाने झाल्या प्रकाराची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. आता तरी विद्यापीठाचे कुलगुरू ताळ्यावर येतील अशी आशा आहे. झाल्या प्रकारावर पांघरूण ओढण्याचा हास्यास्पद प्रयत्न न करता जे घडले त्या चुकीची जबाबदारी निश्चित केली जावी आणि त्याची त्याला शिक्षाही मिळावी. सदर कार्यक्रमात व्यासपीठावर नंगानाच चालला असताना तेथून बाहेर पडू पाहणाऱ्या विद्यार्थिनींना बाहेर जाऊ न देता अडवून ठेवले गेले असेल तर हा सरळसरळ लैंगिक शोषणाचा प्रकार ठरतो. त्या अंगाने झाल्या प्रकाराकडे पाहिले गेले पाहिजे, तरच ह्याचे गांभीर्य संबंधितांना उमगेल. आजकाल विद्यापीठे ही विद्येचे पीठ करणारी ठिकाणे झाली आहेत असे आचार्य विनोबा भावे म्हणायचे. गोवा विद्यापीठाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे हे दुर्दैव!