Home बातम्या ‘त्या’ वाघाचा मृत्यू शिकारीतून नव्हे; पण…

‘त्या’ वाघाचा मृत्यू शिकारीतून नव्हे; पण…

0

>> नमुने विश्लेषणासाठी पाठवले; वनमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

आगलोट, साकोर्डा-धारबांदोडा येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तथापि, वाघाच्या मृत्यू प्रकरणामध्ये शिकारीचा कोणताही संबंध नाही. मृत वाघाचे नमुने न्यायवैद्यक आणि डीएनए विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल आल्तिनो-पणजी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

वाघाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात न आल्याने पर्यावरणप्रेमींकडून वन खाते, राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वन खात्याने तयार केलेला प्राथमिक अहवाल काल जाहीर केला. वन खात्याने साकोर्डा येथे वाघाच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे, असेही मंत्री राणे स्पष्ट केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ मृत्यू प्रकरणात सविस्तर अहवाल तयार केला आहे. वाघाच्या मृत्यूला भरपूर दिवस झाल्याने त्या वाघाच्या मृतदेहाचे मोठ्या प्रमाणात विघटन झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही, असे राणे म्हणाले.

वाघाचा मृतदेह सापडलेल्या परिसराची पाहणी करण्यात आली. त्याठिकाणी शिकारीसाठी वापरले जाणारे कोणतेही साहित्य आढळून आलेले नाही. वन विभागाने वाघाचा मृतदेह सापडलेल्या भागातील नमुने गोळा करून न्यायवैद्यक आणि डीएनए विश्लेषणासाठी पाठविले आहेत, असेही राणेंनी स्पष्ट केले.
बेतोडा येथील गव्यारेड्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. वन विभागाकडून लोकवस्तीत येणाऱ्या हिंस्र वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.