गोव्याची उत्तराखंडवर ३ धावांनी मात

0
115

विनू मांकड अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत काल शुक्रवारी झालेल्या श्‍वास रोखून धरणार्‍या लढतीत गोवा संघाने उत्तराखंडवर ३ धावांनी विजय मिळविला. पुदुचेरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील गोव्याचा हा सलग चौथा विजय आहे. उत्तराखंडने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर गोवा संघाने ५० षटकांच्या खेळात ७ गडी गमावून १८७ धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजी करताना गोव्याकडून सलामीवीर गौरेश कांबळी याने ५९ चेंडूंत ३३ धावा केल्या. मधल्या फळीतील आयुष वेर्लेकर याने ४ चौकार व २ षटकारांसह ४० चेंडूंत नाबाद ४२ धावा केल्या. कर्णधार राहुल मेहता (७) फंलदाजीत अपयशी ठरला. उत्तराखंडकडून गौरव जोशीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. परंतु, ६ बाद १८१ अशा भक्कम स्थितीतून त्यांचा डाव १८४ धावांत आटोपला त्यावेळी तब्बल १४ चेंडूंचा खेळ शिल्लक होता. राहुल मेहता (२८-३) व ऋत्विक नाईक (३६-३) यांनी भेदक मारा केला. मोहित रेडकरने आपल्या १० षटकांत केवळ ३२ धावा मोजून १ गडी बाद केला. शादाब खानने एक बळी घेतला. उत्तराखंडकडून प्रशांत याने सर्वाधिक ३८ धावा केल्या. आर्यन सेठीने ३८ तर गौरव जोशीने ३२ धावांचे योगदान दिले. गोव्याच्या गोलंदाजांनी २३ अवांतर धावांची खैरात उत्तराखंडला वाटली.
रविवार १३ रोजी गोव्याचा संघ चंदीगडशी दोन हात करणार आहे. गोव्याने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत मेघालयचा १८४ धावांनी पराभव केला होता. अरुणाचलविरुद्धचा दुसरा सामना गोव्याने १४७ धावांनी जिंकला होता. तिसर्‍या लढतीत गोव्याने सिक्कीमला ९० धावांनी नमविले होते.