गैरव्यवहार चौकशीला असहकार्य करणार्‍यांवर कारवाई

0
126

>> बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचा इशारा

>> २५ ते ३० विकासकामांची चौकशी गतिमान

सार्वजनिक बांधकाम खात्यातील २५ ते ३० विकास कामांतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आणखीन कालावधीची आवश्यकता आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सहकार्य न करणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिला.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील मागील दोन ते तीन वर्षांतील रस्ता, पाणीपुरवठा, जायका, मलनिस्सारण विभागातील काही विकास कामांची चौकशी केली जात आहे. पंचवीस ते तीस फाईल्सबाबत चौकशी करण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आली आहे.

या चौकशीमध्ये दोषी आढळून येणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कंत्राटदारांनी काही ठिकाणी कामे केलेली नाहीत. तरीही, काही कंत्राटदारांना बिलांची रक्कम फेडण्यात आलेली आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींची विभागीय पातळीवर अधिकार्‍यांकडून प्राथमिक चौकशी करून घेतली जात आहे. या चौकशीमध्ये सहकार्य न करणार्‍या अधिकार्‍यांची बदल केली जाणार आहे. काही कंत्राटदारांनी विकासकामे पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे. कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.
खांडेपार येथे नवीन पुलाच्या खचलेल्या जोड रस्त्याच्या कामाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अधिकार्‍याला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. या रस्त्याचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केले आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

केवळ माजी बांधकाम मंत्र्यांच्या विरोधात चौकशी केली जात नाही. तर, कंत्राटदार, संबंधित अधिकारी यांचीही चौकशी केली जात आहे. बांधकाम खात्याचा चौकशी अहवाल तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.