पुलावरून धावणाऱ्या 5 वाहनांना महिसागर नदीत जलसमाधी
गुजरातच्या बडोदामधील महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा काही भाग कोसळला आणि त्याबरोबर या पुलावरून धावणारी अनेक वाहने नदीत पडली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून, 9 जणांना वाचवण्यात यश आले. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
गुजरातच्या पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे हा गंभीरा पूल होता. महिसागर नदीवरील हा पूल 43 वर्षे जुना होता. तसेच गेल्या वर्षी हा पूल दुरुस्त करण्यात आला होता. हा पूल कोसळल्याच्या घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये एक टँकर तुटलेल्या पुलावरून खाली लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. तसेच नदीत कोसळलेल्या वाहनात अडकलेली एक महिला तिच्या मुलांच्या मदतीसाठी आर्जव करत असल्याचे ऐकू येत आहे. सदर महिलेचे नाव सोनलबेन असे असून, त्या वगळता गाडीतील सर्व प्रवासी ज्यात त्यांचा पती, मुलगा, मुलगी आणि जावई, दोन नातवंडे यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचा एक भाग अचानक खाली कोसळल्यामुळे दोन ट्रक, एक इको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटो-रिक्षा ही वाहने नदीत पडली. एक ट्रक अजूनही धोकादायक स्थितीत पुलावर लटकला आहे. आम्ही किरकोळ जखमी झालेल्या पाच जणांना वाचवले आहे. तसेच या घटनेतील मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य राबवले. जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.