गुजरातमधील बंदरांवर पाक दहशतवादी हल्ल्यांचा इशारा

0
115

समुद्रमार्गे भारतीय हद्दीत घुसून महत्वाच्या ठिकाणांवर जैश ए महंमदचे पाकस्थित कमांडो दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता व्यक्त करणारी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने कांडला व मुंद्रा या गुजरातमधील बंदरांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. भारतीय नौदलानेही काही दिवसांपूर्वी सागरीमार्गे दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता.

अदानी समुहातर्फे चालविले जाणारे मुंद्रा बंदर देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असून गेल्या वर्षी या बंदराने व्यवसायाबाबत अग्रस्थान मिळवले होते. तर सरकारी मालकीचे असलेले कांडला बंदर मोठ्या प्रमाणात माल हाताळणी करते. दोन्ही बंदरे गुजरातच्या कच्छ भागातील अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नजीक आहेत. याच भागात भारताची अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. त्यात जामनगर येथे रिलायन्स उद्योगाकडून चालविली जाणारी जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी व वाडिनार येथे रशियातील रॉसनेफ्ट या कंपनीतर्फे चालविली जाणारी रिफायनरी आहे.

कच्छ जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक डी. बी. वाघेला यासंदर्भात म्हणाले, ‘आम्हाला वेळोवेळी दहशतवाद्यांच्या घुसखोरीविषयी माहिती दिली जाते आणि यावेळी तशी माहिती मिळाल्याने आम्ही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. खरे म्हणजे १५ ऑगस्ट आधीही आम्ही सुरक्षा वाढवली होती. दहशतवादी गुजरातेत घुसले असल्याची ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र तशी शक्यता असल्याची सर्वसाधारण माहिती मिळाली आहे.’

या पार्श्‍वभूमीवर अन्य सुरक्षा यंत्रणांसह पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. किनारी पोलिसांची गस्त वाढविली आहे.
छोट्या बोटींमधून गुजरातमधून घुसखोरी करून तेथील भागांत जातीय दंगा माजवित दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे.