Home बातम्या इफ्फीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात

इफ्फीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात

0

सजावट व रोषणाईचे काम युद्धपातळीवर

गुरूवारी उघडणार इफ्फीचा पडदा

येत्या गुरूवारपासून राजधानी पणजी शहरात होऊ घातलेल्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी पणजीत इफ्फीसाठीची साधनसुविधा उभी करण्याचे काम जोरात सुरू आहे. इफ्फीचे प्रमुख स्थळ असलेल्या आयनॉक्स परिसरातील सजावटीचे व रोषणाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा इफ्फीस्थळावरील रेड कार्पेटवरून थेट आयनॉक्समधील चित्रपटगृहात जाणे सेलिब्रिटिंसाठी सोपे व्हावे यासाठी आयनॉक्स प्रांगणात एक सुंदर असा लाकडी पूल उभारण्यात आलेला आहे. हा पूल या इफ्फीत आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. मात्र, तसे असले तरी इफ्फी प्रांगणातील मोकळ्या जागेत तो इफ्फी प्रतिनिधींसाठी अडथळा निर्माण करणारा ठरणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

सजावट व स्टॉल्सचे काम
दरम्यान, इफ्फी स्थळावर सजावटीचे काम तसेच आवश्यक ते स्टॉल्स उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच इफ्फीचा उद्घाटन सोहळा पणजी शहरात होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पणजी शहरात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी गृहखात्याला सांभाळावी लागणार आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यासाठी आखणी करू लागले आहेत. उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातून एक भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असल्याने यंदाच्या या उद्घाटन सोहळ्याला शिगमोत्सव व कार्निव्हल उत्सवासारखे रूप प्राप्त होणार आहे. परिणामी 20 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. इफ्फीनिमित्त पणजी बसस्थानकातून मिरामारपर्यंत वेगवेगळे फलक यापूर्वीच लावण्यात आलेले आहेत. कला अकादमीच्या वास्तूतही इफ्फीसाठीची सगळी तयारी पूर्ण करण्यासाठीचे काम जोरात सुरू आहे. यंदाच्या इफ्फीसाठी आतापर्यंत 7500 प्रतिनिधींनी नोंदणी केलेली आहे. यंदाचा हा उद्घाटन सोहळा खुल्या वातावरणात होणार असून गोमंतकीयांनी उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेले आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी यंदा कोणकोणते बॉलिवूड तसेच दक्षिणात्य व अन्य राज्यातील कलाकार येणार आहेत. ते आयोजकांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.