Home कुटुंब आई थोर तुझे उपकार!

आई थोर तुझे उपकार!

0
  • शीतल सराफ

‘स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी’ म्हणतात. आई, नऊ महिने तू मला तुझ्या पोटात वाढवलेस. तू केलेले गर्भसंस्कार आज मला उपयोगी पडत आहेत. गर्भात असतानाच कदाचित तू आमची नाळ घट्ट करून घेतलीस. तुला झालेला त्रास, यातना मला तेव्हा नाही, आता कळतोय…
तरुणवयात प्रत्येकाला आपले आईवडील खलनायक वाटतात. पण नंतर त्याचा पश्चात्ताप होतो. माझ्या आजारपणात त्या जागलेल्या रात्री तू विसरली नसशील. पण मीही विसरले नाही. सगळ्यांनी हात टेकले पण तू मात्र हार मानली नाहीस. मला आजारातून बाहेर काढून पुन्हा नवजीवन दिलंस.
गरिबीत आणि श्रीमंतीतही नम्रपणे वागण्याचं शिक्षण मी तुझ्याकडूनच घेतलं. आता चार पैसे हाती आले तरी गरिबीचे ते दिवस मी विसरले नाही. हात आकाशापर्यंत पोचावे, पण पाय जमिनीवरच राहावे हे मी तुझ्याकडूनच शिकले. गरिबीत खचून जायचं नाही, खंबीरपणे संकटांना तोंड देत जायचं हेही तूच मला शिकवलेस. तुझ्या तोंडून रोज ऐकू येणारं वाक्य मला प्रेरणादायी ठरलं. ‘सोसलेलं आणि पोसलेलं कधीही फुकट जात नाही!’ काही गोष्टी सहन करायच्या असतात, त्याचं फळ खूप गोड असतं, हे मी अनुभवावरून शिकले. पण ही शिकवण मात्र तुझीच होती. तू आमच्यासाठी केलेला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला आहे. केवढी संकटं, केवढी दुःखं तू पचवलीस! न हारता, न डगमगता प्रत्येक संकटाशी तू झुंजत राहिलीस. न कुणाकडून कसली अपेक्षा ठेवलीस, नाही कुणाकडे कधी हात पसरला. सदा हसरा चेहरा घेऊन वावरलीस.
तुझ्या गोड स्वभावामुळे आमच्या घरात माणसांची काही कमी नाही. स्वतः खायच्या आधी दुसऱ्याच्या तोंडात घास जावा असा तुझा स्वभाव, त्यामुळे तुला कुणी कधी परके वाटलेच नाहीत. परंतु माझी काळजी करणे तू अजूनही थांबवले नाहीस. माझ्या काळजीने तुझा जीव कासावीस होतो. मी मोठी झाले याची जाणीव तुला नसावी.
आई तू दिलेले संस्कार मी सदैव जपून ठेवीन. आता तू नाही आम्ही तुझी काळजी घेऊ. तू फक्त वटवृक्षासारखी उभी रहा!