अफगाणिस्तानचा पाकिस्तानला शॉक

0
116

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना स्वतःला भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणवणार्‍या पाकिस्तानला नवख्या अफगाणिस्तानकडून विश्‍वचषकासाठीच्या सराव लढतीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकने विजयासाठी ठेवलेले २६३ धावांचे लक्ष्य अफगाण संघाने ४९.४ षटकांत ७ गडी गमावून गाठताना इतर संघांना इशारा दिला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संंघ पूर्ण पन्नास षटकेदेखील खेळू शकला नाही. अफगाणिस्तानच्या भेदक मार्‍यासमोर पाकच्या बहुतेक सर्व खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. केवळ बाबर आझम याने समयोचित खेळ दाखवत ११२ धावांचे योगदान दिले.

हशमतुल्ला शाहिदीच्या संयमी नाबाद ७४ धावा व सलामीवीर झाझायने केवळ २८ चेंडूंत कुटलेल्या ४९ धावांवर आरुढ होत अफगाणिस्तानने विजयाला गवसणी घातली. पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज वहाब रियाझला या सामन्यात सूर गवसला. दीर्घ कालावधीनंतर खेळत असलेल्या वहाबने ‘डेथ ओव्हर्स’मध्ये रिव्हर्स स्विंगचा पुरेपूर वापर करत अफगाण संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, धावांच्या पाठबळाअभावी पाकला पराभवाचा सामना करावा लागला.

धावफलक
पाकिस्तान ः इमाम उल हक त्रि. गो. हामिद हसन ३२, फखर झमान त्रि. गो. नबी १२, बाबर आझम झे. रहमत गो. दौलत ११२, हरिस सोहेल त्रि. गो. नबी १, मोहम्मद हफीझ झे. रहमत गो. राशिद १२, शोएब मलिक झे. नजिबुल्ला गो. नबी ४४, सर्फराज अहमद यष्टिचीत शहजाद गो. राशिद १३, इमाद वासिम धावबाद १८, हसन अली झे. रहमत गो. आफताब ६, शादाब खान झे. समिउल्ला गो. दौलत १, वहाब रियाझ नाबाद १, अवांतर ३, एकूण ४७.५ षटकांत सर्वबाद २६२

गोलंदाजी ः दौलत झादरान ५.५-०-३७-२, मुजीब रहमान ६-०-३९-०, मोहम्मद नबी १०-०-४६-३, हामिद हसन ६-०-३१-१, राशिद खान ९-१-२७-२, गुलबदिन नैब ५-०-३३-०, आफताब आलम ६-०-४७-१
अफगाणिस्तान ः मोहम्मद शहजाद जखमी निवृत्त २३, हझरतुल्ला झाझाय झे. शोएब गो. शादाब ४९, रहमत शाह झे. सर्फराज गो. वहाब ३२, हशमतुल्ला शाहिदी नाबाद ७४, समिउल्ला शेनवारी झे. शादाब गो. इमाद २२, असगर अफगाण त्रि. गो. इमाद ७, मोहम्मद नबी झे. सर्फराज गो. हसनैन ३४, गुलबदिन नैब त्रि. गो. वहाब २, नजिबुल्ला झादरान पायचीत गो. वहाब १, राशिद खान नाबाद ५, अवांतर १४, एकूण ४९.४ षटकांत ७ बाद २६३
गोलंदाजी ः मोहम्मद आमिर ६-०-२७-०, शाहिन शाह आफ्रिदी ६-०-५१-०, वहाब रियाझ ७.४-०-४६-३, मोहम्मद हफीझ ४-०-१२-०, शादाब खान १०-०-६४-१, मोहम्मद हसनैन ६-०-३४-१, इमाद वासिम १०-०-२९-२