कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणातील संशयित आरोपी सोहम नाईक याच्याविरोधात गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पाचवा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, येथील बाल न्यायालयाने सोहम नाईक याची काल 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तथापि, गुन्हा विभागाने दुसऱ्या प्रकरणामध्ये सोहम नाईक याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काल पाटो-पणजी येथील बाल न्यायालयासमोर सोहम नाईक याला हजर करण्यात आले. पहिल्या प्रकरणात सुमारे 8 दिवस त्याची पोलीस कोठडीत चौकशी झाली होती. यानंतर आता बाल न्यायालयाने 14 दिवसांसाठी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला. दरम्यान, सोहम याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची आणखी एक तक्रार दाखल झाली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्याच्याविरोधात पाचवा गुन्हा दाखल केला आहे.