Home Featured सोहम नाईकच्या घराची गुन्हा अन्वेषणकडून झडती

सोहम नाईकच्या घराची गुन्हा अन्वेषणकडून झडती

0

कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने काल संशयित आरोपी सोहम नाईक याच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांनी मोबाईल फोन, छायाचित्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या वासनाकांड प्रकरणाचा तपास कुडचडे पोलिसांकडून गुन्हा विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात सोहम नाईक याला अटक करून चार दिवसांचा रिमांड घेण्यात आलेला आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी सोहम नाईक याने युवतींना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली. त्यात अल्पवयीन मुलींचा सुध्दा समावेश आहे. संशयित आरोपीने मुलींवर अत्याचार करून त्यांची अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ तयार केले, असा आरोप केला जात आहे.
गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तपासकाम सुरू आहे. संशयित आरोपी सोहम नाईक याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेला मोबाईल, छायाचित्रे न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांना आणखी तीन पीडितांची ओळख पटली असून, त्यांचे जबाब सध्या नोंदवले जात आहेत. पीडितांना विश्वासात घेण्यासाठी बिगर सरकारी संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि सतावणुकीच्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला जात आहे. या प्रकरणात पॉक्सो आणि बाल कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. कथित वासनाकांड प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना गजाआड केले जाणार आहे. सध्या पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहे. पीडित व इतरांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत, असेही पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

प्रकरण संवेदनशील : महासंचालक
कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे तपासकाम गुन्हा विभागाकडे सोपविण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल केले. वासनाकांड प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यातील पीडित मुलींची ओळख गुप्त ठेवली जात आहे, असेही ते म्हणाले.