हॉटेल्स, लघुउद्येोगांवर परिणाम होण्याची शक्यता
सिलेंडरचा अद्यापही तुटवडा
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जाणवू लागला आहे. युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई वाढत असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा विस्कळीत होत आहे. गॅस सिलेंडर पुरवठ्यावर याचा परिणाम दिसून येत असून काल दि. 1 एप्रिलपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत 195.50 रुपये तर कोलकातामध्ये 218 रुपयांनी ही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून याचा परिणाम हॉटेल्स आणि लघुउद्योगांवर दिसून येण्याची शक्यता आहे. काल एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सरकारकडून वाढवण्यात आला असला, तरी अद्यापही तुटवडा जाणवत आहे. यातच आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्याने अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
देशभरातील अनेक ठिकाणी जनता गॅस मिळवण्यासाठी रांगा लागत असून बुकिंगनंतर अनेक दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा कमी झाला असून देशातील हॉटेल, लघू खानपान व्यवसाय संकटात सापडले आहेत. सिलेंडरचा पुरवठा नियमित होत नसल्याने मच्छिमार बांधवांपासून ते खानावळींपर्यंत सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 195.50 रुपयांनी, तर कोलकातामध्ये 218 रुपयांनी वाढला आहे. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
गोव्यात आस्थापनांना 60 टक्के सिलेंडर मिळणार
नागरी पुरवठा सचिवांकडून गॅस कंपन्यांना निर्देश
राज्यातील व्यावसायिक आस्थापनांसाठी 60 टक्के व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करण्याचा निर्देश राज्यातील सर्व एलपीजी गॅस कंपन्यांना देण्यात आला आहे. राज्याचे नागरी पुरवठा सचिव संजीव गडकर यांनी यासंबंधीचा एक आदेश काल जारी केला आहे.
राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट व इतर व्यावसायिक आस्थापनांना व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे पदार्थ बनविण्यावर निर्बंध घालावे लागले आहे. तर, काही व्यावसायिकांना गॅस टंचाईमुळे आस्थापने बंद ठेवावी लागली आहेत.
एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे सुरुवातीला व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या मागणीच्या केवळ 20 टक्के व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध केला जात होता. तर, औद्योगिक आस्थापनांना गॅस सिलिंडर साठा उपलब्ध करणे बंद करण्यात आले होते.
21 मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट या आस्थापनांना अतिरित्त 20 टक्के एलपीजी साठा उपलब्ध करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर, 27 मार्चपासून औद्योगिक वापरासाठी 20 टक्के एलपीजी सिलिंडर देण्याचा आदेश देण्यात आला होता. आता, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील व्यावसायिक आस्थापनांना 60 टक्के एलपीजीसाठा उपलब्ध करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. राज्यात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा करणाऱ्या आठ आस्थापनांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.