मुख्यमंत्रीपदी पर्रीकरच कायम राहणार

0
96

पणजी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत अफवा पसरविण्यात येत आहेत. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असून मध्यावधी निवडणूक होणार नाही, असे स्पष्टीकरण गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल केले. भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत नेतृत्व बदलाच्या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. या बैठकीत केवळ भाजपच्या संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांच्या अध्यक्षेखाली भाजप विधिमंडळ गटाची बैठक भाजप मुख्यालयात काल संध्याकाळी घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे मंत्री विश्‍वजित राणे, नीलेश काब्राल, मिलिंद नाईक, मावीन गुदिन्हो, सभापती डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, आमदार ग्लेन टिकलो, राजेश पाटणेकर, एलिना साल्ढाणा, कार्लुस आल्मेदा, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती. आमदार प्रवीण झांट्ये गोव्याबाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाही. भाजपचे तिघेजण आजारी आहेत.
पर्रीकरांची प्रकृती स्थिर
भाजपचे राज्य सरचिटणीस सदानंद तानावडे यांच्या समवेत काल सकाळी दोनापावल येथील निवासस्थानी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर व चांगली आहे. त्यांना आणखीन दोन दिवस विश्रांती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर ते मंत्री, पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांना भेटणार आहेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
मंत्री कार्यकर्त्यांना भेटणार
गेले कित्येक महिने भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक घेण्यात आली नव्हती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी जाणून घेण्याची सूचना भाजपच्या मंत्र्यांना करण्यात आली आहे. भाजप मतदारसंघ सोडून मंत्र्यांना दोन-दोन मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्र्यांकडून मतदारसंघात जाऊन मतदारसंघ अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.