Home बातम्या मिराबागचा बंधारा रद्द न केल्याससोमवारपासून पणजीत आंदोलन

मिराबागचा बंधारा रद्द न केल्याससोमवारपासून पणजीत आंदोलन

0

मिराबाग-सावर्डे येथील नियोजित झुआरी नदीवरील सुमारे 400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बंधारा प्रकल्पाचे काम रद्द केल्याचे लेखी आश्वासन 2 दिवसांत न दिल्यास येत्या सोमवार दि. 30 मार्च रोजी पणजीच्या आझाद मैदानावर आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा संकेत भंडारी यांनी ग्रामस्थांच्या बैठकीनंतर बोलताना मिराबाग सावर्डे येथे काल दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी संध्याकाळी आल्तिनो-पणजी येथे सरकारी निवासस्थानी मिराबाग येथील नियोजित बंधाऱ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बंधारा प्रकल्पाऐवजी नदीत जॅकवेलच्या माध्यमातून पाणी खेचण्याचा प्रस्ताव मांडला. या नवीन प्रस्तावावर ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मिराबाग ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत स्पष्ट केले होते.
गुरुवारी मिराबाग येथील ग्रामस्थांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला. या बैठकीत जॅकवेलच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात आला. तथापि, सर्व ग्रामस्थांनी प्रथम बंधारा प्रकल्प पूर्णपणे रद्दबातल केल्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली.