Home बातम्या भारतासाठी होर्मुजचा मार्ग अखेर खुला

भारतासाठी होर्मुजचा मार्ग अखेर खुला

0

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती; इराणचा
सर्वात जवळच्या 5 मित्र देशांना दिलासा

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजली जाणारी होर्मुजची सामुद्रधुनी इराणने शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली असतानाच, भारतासाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत हा इराणच्या 5 सर्वात जवळच्या मित्र देशांपैकी एक असून, भारतीय जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी काल दिली. जवळपास चार आठवड्यांपासून बंद असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन आणि गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. सामुद्रधुनी खुली झाल्याने भारताला मोठा दिलासा मिळणार आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केल्यानंतर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली. होर्मुझ बंद असल्यामुळे तेल, गॅस वाहतुकीला खीळ बसल्याचे गुटेरस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, संघर्षावर मार्ग काढून युद्ध तात्काळ समाप्त करण्याची मागणी केली होती.
या आवाहनानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुजमधून जाताना भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना कोणताही अडथळा येणार नाही. आमच्या नजरेत हा मार्ग सर्वांसाठी बंद नाही. आम्ही आमच्या मित्रांसाठी मार्ग मोकळा ठेवला आहे, पण शत्रूंना तेलाचा एक थेंबही येथून नेऊ देणार नाही, असे अब्बास अराघची म्हणाले.

अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांशी संबंधित जहाजांना शत्रू मानले जाणार आहे. त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. ज्या देशांनी इराणविरुद्ध कोणत्याही आक्रमक कारवाईत सहभाग घेतलेला नाही, त्यांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य आहे, असेही अराघची यांनी स्पष्ट केले.

भारताचे आणखी एक मोठे यश
पश्चिम आशियातील संकटामुळे भारताची 18 जहाजे होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात अडकून पडली होती; मात्र, भारताच्या यशस्वी कूटनीतीमुळे पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणारी 4 जहाजे आधीच सुखरूप बाहेर पडली असून, 5 अधिक जहाजे लवकरच भारतात पोहोचतील. या कठीण काळात भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आणि ओमानच्या आखातात 5 हून अधिक आघाडीच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. एलपीजी, एलएनजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी भारतीय नौदल कवच बनून भारतीय मालवाहू जहाजांना एस्कॉर्ट करत आहे.

होर्मुजवर टोल
वसुलीची तयारी

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. इराणची संसद आता या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून ‘टोल’ (शुल्क) वसूल करण्यासाठी नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. त्यामुळे इराणला अतिरिक्त महसूल तर मिळेलच, शिवाय जागतिक जलमार्गावर त्यांचे कायदेशीर वर्चस्वही प्रस्थापित होईल.

पंतप्रधानांची आज सर्व
राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा
पश्चिम आशियातील लांबलेले युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दि. 27 मार्च रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. ज्या राज्यांना एलपीजी गॅसचा तुटवडा अधिक भासत आहे, त्या राज्यांशीही पंतप्रधान संवाद साधतील. या बैठकीत पुरवठा साखळी, ऊर्जा उत्पादनांची सुरक्षा आणि विदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या विषयावर चर्चा केली जाणार आहे. सर्व राज्य आणि केंद्र यांच्यात योग्य समन्वय राखून ‘टीम इंडिया’ या भावनेला अधिक महत्त्व देण्यासाठी मोदी बैठक घेत आहेत.