कांदोळी आरोग्य केंद्राच्या बनावट दाखला प्रकरणात बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा पोलिसांनी काल अटक केली. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्या दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बर्च या नाईटक्लबच्या रेस्टॉरंटसाठी मद्य परवाना मिळविण्यासाठी कांदोळी येथील आरोग्य केंद्राच्या बनावट दाखल्याचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी कांदोळी आरोग्य केंद्राने तक्रार दाखल केली होती.
या बनावट दाखला प्रकरणात सहमालक अजय गुप्ता याला अटक करून त्याची जामिनावर सुटका झाली होती, तर सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने लुथरा बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर, म्हापसा पोलिसांनी लुथरा बंधूंना अटक करून तपासाला सुरुवात केली आहे.