काँग्रसचाही प्रचारावर जोर
फोंडा निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची
फोंडा मतदारसंघात होत असलेली गोवा विधानसभेसाठीची पोटनिवडणूक ही सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष अशा सर्वांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराचे काम जोरात हाती घेतले आहे.
सत्ताधारी भाजपच्यावतीने बहुतांश दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे. यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार गोविंद गावडे, दाजी साळकर, नरेंद्र सावईकर, गोविंद पर्वतकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर, विश्वास सतरकर, सुवर्णा तेंडुलकर आदी नेत्यांनी स्वत:ला प्रचार कार्यात झोकून दिले असल्याचे काल भाजपमधील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.
उमेदवार रितेश नाईक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मंत्री सुभाष शिरोडकर व गोविंद गावडे यांची उपस्थिती होती. सध्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर पक्षाने भर दिलेला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात मंत्री दिगंबर कामत, रोहन खंवटे, मायकल लोबो हे सहभागी होणार असल्याचीही माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
येत्या 6 एप्रिल रोजी भाजपची प्रचार सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसकडूनही प्रचार
काँग्रेस पक्षानेही आपला प्रचार जोरात सुरू केला असून पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाच्या अन्य नेत्यांनी फोंड्यातील घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.
मडकईतील भाजप
कार्यकर्ते सहभागी
फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी भाजप उमेदवार रितेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत तिस्क – फोंडा परिसरात प्रचार केला. यावेळी प्रचारात उतरलेल्या रितेश नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारावर भाजप उमेदवार रितेश नाईक यांनी जोर दिला आहे. उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचबरोबर इतर मंत्री प्रचारात व्यस्त आहेत. रविवारी सकाळी मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभागी घेऊ रितेश नाईक यांना पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी प्रचारात नगरसेवक रूपक देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते भाई उर्फ गुरुनाथ नाईक, हनुमंत नाईक, दिनेश वळवईकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मडकई भाजप मंडळाचे सचिव दिनेश वळवईकर यांनी येणाऱ्या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोर दिला असून प्रत्येक मतदारांचे गाठीभेटी घेण्यात येत आहे. मडकई मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारात भाग घेऊन रितेश नाईक यांना पाठिंबा दिला असल्याचे
सांगितले.
रितेश नाईक यांनी स्व. रवी नाईक यांनी केलेल्या विकासकामांचा लाभ होणार आहे. प्रचारावेळी रवी नाईक यांनी केलेल्या कामाची माहिती लोक देत आहे. प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहता विजय नक्की असल्याचे सांगितले.