Home Featured पणजी महापालिका निवडणुकीत मतदान गोपनियतेचा भंग

पणजी महापालिका निवडणुकीत मतदान गोपनियतेचा भंग

0

पर्रीकर गटाकडून न्यायालयात याचिका दाखल, आज सुनावणी

पणजी महानगरपालिका मंडळाच्या 11 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीला आव्हान देणारी एक याचिका उत्पल पर्रीकर गटाचे उमेदवार ॲड. विष्णू नाईक, डिओदिता परेरा, वैभव साळगावकर आणि प्रशिला कुंकळ्ळीकर यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या निवडणुकीत मतदारांच्या मतदान गोपनीयतेचा भंग करण्यात आला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेत राज्य निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी आणि सर्व 30 नगरसेवकांना प्रतिपादी करण्यात आले आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

पणजी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्या आहेत. महानगरपालिका निवडणूक ही मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात आली होती. या मतपत्रिकेच्या दोन्ही भागात अनुक्रमांक छापण्यात आले होते. मतपत्रिकेवर मतदाराचा नोंदणी क्रमांक आणि सही घेतली जात होती. असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला.

उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने महानगरपालिका निवडणुकीला आव्हान देणारी याचिकेवर 8 एप्रिल 2026 सुनावणी घेण्यात आली असून आव्हान याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. यावेळी ॲड. विष्णू नाईक, मिनिनो दा क्रुझ यांची उपस्थिती होती.

फेररचनेला आव्हान
पणजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मिनिनो दा क्रुझ यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग फेररचनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पणजी महानगरपालिकेच्या प्रभाराची रचना करायला हवी होती. पण, पणजी महानगरपालिकेच्या प्रभागाची फेररचना राज्य सरकारच्या नगरपालिका संचालनालयाने केले आहे. सर्वोच्च न्यायालयात या आव्हान याचिकेवर सुनावणी घेतली जात आहे, अशी माहिती माजी नगरसेवक मिनिनो दा क्रुझ यांनी दिली.