Home Featured नगरपालिका प्रभाग फेररचनेविषयीलोकांकडून सूचना, आक्षेप मागवले

नगरपालिका प्रभाग फेररचनेविषयीलोकांकडून सूचना, आक्षेप मागवले

0

गोवा राज्य निवडणूक आयोगाने आगामी 11 नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रभागांची फेररचना करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करताना काल त्यासाठीची जाहीर नोटीस जारी केली. त्याद्वारे प्रभाग फेररचनेबाबत नागरिकांकडून सूचना, आक्षेप, बदल व दुरुस्त्या मागवल्या आहेत.

राज्यातील पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा व सांगे या अकरा नगरपालिकांची मेमध्ये निवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील नोटीस जारी केली आहे. याद्वारे प्रत्येक नगरपालिकेतील प्रभागांची संख्या तसेच त्यांचा भौगोलिक आकार निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभागांची फेररचना केली जाणार आहे.

हे काम हाती घेण्यासाठी संबंधित तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांची निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना या कामात सहकार्य करण्यासाठी संबंधित मामलेदारांची सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रभाग फेररचनेचे मसुदे जनतेला तपासणीसाठी 7 एप्रिलपर्यंत उपलब्ध करून दिले जातील. हे मसुदे पाहणीसाठी संबंधित मामलेदारांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. लोकांनी आपल्या सूचना 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळवाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.